नागपूर : पतंगाच्या छंदापोटी दरवर्षी शहरात गळेकापी होऊन काहींचा जीवही गेला आहे. या पतंगाच्या कापाकापीसाठी वापरल्या जाणारा नायलॉन मांजा मकर संक्रांतीच्या काळात जीवघेणी संक्रांत घेऊन येतो. यंदाही या मांजामुळे दोघांचे गळे कापले आहे. एका तरुणीचा पायाचे हाड मांजामुळे कपले आहे. तर पतंग लुटताना एक बालक रेल्वेखाली येऊन जीव गमावून बसला आहे. आज मकर संक्रात आहे. आकाशात पतंगांचा खेळ रंगणार आहे. त्यामुळे रस्त्यावरून चालताना, वाहने चालविताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
या जीवघेण्या खेळाची हौस फिटविण्यासाठी नायलॉन मांजाचे तस्कर शहरात तयार वाढले आहे. पतंग शौकिनांना तीन पट किमतीमध्ये मांजा पुरविला जातोय. या मांजाची विक्री थांबविण्यासाठी पोलिसांनीही कंबर कसली आहे. आठवड्याभरात दोन ठिकाणी छापे टाकून पाच तस्करांना अटक केली असून, आठ लाखांचा माल जप्त केला आहे. तर प्रतिबंधित मांजाच्या विक्री व वापराविरुद्ध जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून, कडक कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. महापालिका क्षेत्रात झोननिहाय टास्क फोर्स समित्या गठित केल्या आहे. परराज्यातून येणाऱ्या नायलॉन मांजावर आळा घालण्यासाठी पोलिस चेकपोस्ट ॲक्टीव्ह करण्यात आले आहे. तर सायबर सेलला ही ऑनलाइन मांजा विक्रीवर कारवाईच्या सूचना दिल्या आहे.
- नायलॉन मांजा टाळा, तक्रार करा
नायलॉन मांजा हा धोकादायक असून, यासंदर्भात वारंवार आवाहन करण्यात येत आहे. जर कुणी नायलॉन मांजाचा वापर करीत असेल किंवा नायलॉन मांजाचा उपयोग करीत असेल तर थेट पोलिसांना कळवा, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.
- ही घ्या काळजी
दुचाकी कमी वेगाने चालवा
उड्डाणपुलावरून वाहने चालविताना सावध राहा.
गळ्याभोवती जाड रुमाल, स्कार्फ किंवा मफलर गुंडाळा.
रुमाल, स्कार्फ नसेल तर शर्टचे वरील बटण लावा.
हेल्मेटची काच लावून दुचाकी चालवा.
मांजा समोर आला तर हात समोर करून गळा वाचवा.
कुणी नायलॉन मांजा वापरत असेल तर लगेच पोलिसांना कळवा.