मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संस्कृत ही अतिप्राचीन भाषा असली तरी सध्या संस्कृत जाणणाऱ्यांची मोजकीच संख्या आढळते. त्यामुळे संस्कृत भाषेच्या प्रेमाखातर आणि तिच्या प्रचार प्रसारासाठी नागपुरातील काही महिलांनी सोशल मिडियावर व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला. आज या ग्रुपची महत्ती सातासमुद्रापार पोहचली आहे. या माध्यमातून संस्कृत भाषेच्या संवर्धनाचे एक सकारात्मक पाऊल पुढे पडत आहे. या माध्यमातून भाषांच्या जननीचा आधुनिक संवाद घडत आहे.‘संस्कृत सखी सभा’ असे या ग्रुपचे नाव आहे. संस्कृतच्या निवृत्त शिक्षिका विजया जोशी यांनी २९ डिसेंबर २०१६ मध्ये या ग्रुपची स्थापना केली होती. सुरुवातीला या ग्रुपमध्ये विजया जोशी यांच्या विद्यार्थिनी जुळल्या. त्यानंतर संस्कृत भाषेची तज्ञमंडळी जुळली. आता या ग्रुपमध्ये ज्यांना संस्कृत भाषेची आवड आहे, अशा महिलाही जुळत आहे. या ग्रुपमध्ये १८ वर्षाच्या तरुणीपासून ८० वर्षाची आजी सुद्धा सदस्य आहे. हा ग्रुप आता निव्वळ नागपूर अथवा महाराष्ट्रापुरता राहिलेला नाही तर विदेशात राहूनही संस्कृतची आवड जोपासणाऱ्या महिलासुद्धा ग्रुपशी जुळल्या आहेत. १५० हून अधिक सदस्य असलेल्या या ग्रुपमधून संस्कृत भाषेत संवाद साधला जातो. संस्कृत भाषेचे ज्ञान एकमेकांपर्यंत पोहोचविण्यात येते. विशेष म्हणजे या ग्रुपमध्ये महिलांना जुळवून घेण्यापूर्वीच त्यांना अलर्ट केले जाते. कुणीही शुभ प्रभात, शुभ रात्री अथवा कुठल्याही सणांच्या, वाढदिवसांच्या शुभेच्छा संदेश टाकण्यास मज्जाव केला जातो. प्रश्नावलीच्या माध्यमातून संस्कृत भाषेचे आदानप्रदान करण्यात येते. संस्कृतची नवीन पुस्तके, त्यावरील लेख, संस्कृत भाषेसंदर्भातील कार्यक्रम आदी माहिती एकमेकांशी शेअर करण्यात येते. या ग्रुपमध्ये संस्कृत भाषेच्या तज्ञ डॉ. शारदा गाडगे, डॉ. वीणा गाणू या मार्गदर्शक म्हणून आहे. संस्कृतमधील कुठलाही शब्द, व्याकरण, बोलताना येणाऱ्या अडचणी, भाषेच्या संदर्भातील माहिती या मार्गदर्शकाकडून सोडविण्यात येतात. संस्कृतातील श्लोक, सुभाषित नियमित टाकण्यात येतात. नुकताच या ग्रुपच्या सदस्यांकडून संस्कृत भाषेत एका अंताक्षरी स्पर्धेचे आयोजन केले होते. संस्कृत भाषा टिकविण्यासाठी सरकारने शालेय शिक्षणात संस्कृत एक विषय म्हणून मान्य केला आहे. पण भाषेच्या संवर्धनासाठी खूप प्रयत्न होताना दिसत नाही. पण दैनंदिन व्यवहारात संस्कृत कशी रुजेल यासाठी संस्कृत सखी सभा या ग्रुपचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे.
संस्कृत सर्व भाषांची जननी मानली जाते कारण अनेक भारतीय भाषांमधील शब्द संस्कृत भाषेत सापडतात. मात्र, संस्कृत जाणणाऱ्यांची आणि बोलणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने संस्कृत काहीशी लोप पावत असल्याचे चित्र आहे. संस्कृत भाषा टिकावी. ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी. त्यासाठी संस्कृत भाषेची महती लोकांना सांगून तिचा प्रचार प्रसार करण्याच्या उद्दिष्टाने आमचा संस्कृत सखी सभा हा ग्रुप कार्य करतोय.- विजया जोशी, ग्रुप अॅडमिनमला संस्कृत आवडायचे. संस्कृतचा अभ्यासही मी करीत आहे. पण बोलण्याचे धाडस होत नव्हते. या ग्रुपमुळे माझा संस्कृतचा शब्दसंग्रह वाढला आहे. आता संस्कृतमधून संवाद साधण्याचे धाडस मी करते आहे.- सोनाली अडावदकर, ग्रुप मेंबर