मानकापुरात सैराट बर्थ डे पार्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:08 AM2021-03-08T04:08:43+5:302021-03-08T04:08:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दारूच्या नशेत टुन्न होऊन बर्थ डे पार्टीच्या नावाखाली धुमधाम करणाऱ्या पाच मद्यधुंद तरुणींसह ११ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दारूच्या नशेत टुन्न होऊन बर्थ डे पार्टीच्या नावाखाली धुमधाम करणाऱ्या पाच मद्यधुंद तरुणींसह ११ जणांना ताब्यात घेतले. मानकापूर पोस्ट ऑफिसच्या मागे शनिवारी मध्यरात्री पोलिसांनी एका घरात छापा घालून ही कारवाई केली.
मानकापूर पोस्ट ऑफिसमागे सिंधीया नामक व्यक्तीच्या घरात सैराट झालेली मंडळी गोंधळ घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलीस उपायुक्त विनीता साहू, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार आणि मानकापूरच्या ठाणेदार वैजयंती मांडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यरात्री १ वाजता पोलिसांनी सिंधीयाच्या घरी छापा घातला. यावेळी तेथे हुक्क्याचा कश अन् मद्याचे पेग चढवत ५ तरुणी आणि ६ तरुण पोलिसांना आढळले. त्या ठिकाणी हुक्का पॉट, तंबाखूचे फ्लेवर, बिअर, व्हिस्की तसेच रमच्या बाटल्या आढळल्या. जवळपास सर्वच जण मद्याच्या नशेत टुन्न झाले होते. पोलिसांना पाहून त्यांची नशा उतरली. आम्ही येथे बर्थ डे पार्टी करीत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तेथून नशेचे ते सर्व सामान जप्त करून अमित भवानीप्रसाद साैंधिया, कबीर भूषण शर्मा, शुभम कमलेश डोंगरे, प्रशांत बळीराम उके, साहिल सूरज जनबंधू आणि अभिषेक जितेंद्र सांगोळे तसेच पाच तरुणी अशा ११ जणांना ताब्यात घेतले. यातील काही जण वेगवेगळ्या कंपनीत कामाला असल्याचे तर काही जण शिक्षण घेत असल्याचे तपासात पुढे आल्याचे मानकापूर पोलिसांनी सांगितले.
---
नागरिकांची गर्दी, मित्रही आले
पोलिसांनी सैराट पार्टीवर छापा घातल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या नागरिकांनी तेवढ्या रात्री तेथे गर्दी केली. तर, कोरोनाचा धोका असूनही पार्टी करणारे मद्यधुंद मित्र-मैत्रिणी पकडल्या गेल्याचे कळाल्याने संबंधित तरुण-तरुणीचे मित्रही पोलीस ठाण्यात पोहचले. अटकेची कागदोपत्री कारवाई पूर्ण झाल्यानंतर त्यांना जामिनावर मुक्त करण्यात आले. पोलीस उपायुक्त विनीता साहू, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार आणि मानकापूरच्या ठाणेदार वैजयंती मांडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डॉ. प्रसाद रणदिवे, राजेंद्र सेंगर, हवलदार रामेश्वर गिते, नायक राजेश वरठी, अमोल लोणकर, दीपक डबरासे, महिला शिपाई नगमा शेख आणि कविता दुर्गे यांनी ही कामगिरी बजावली.