शिक्षेचे समाधान, पण छत्र हरविल्याचे दु:ख कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:07 AM2021-07-21T04:07:24+5:302021-07-21T04:07:24+5:30
भिवापूर : हातवारी कर्ज देत सावकाराने अख्खी शेतजमीन हडपण्याचा डाव साधला. फसगत झाल्याचे लक्षात येताच, रोशनने आत्महत्या केली. तीन ...
भिवापूर : हातवारी कर्ज देत सावकाराने अख्खी शेतजमीन हडपण्याचा डाव साधला. फसगत झाल्याचे लक्षात येताच, रोशनने आत्महत्या केली. तीन वर्षांनंतर मंगळवारी या प्रकरणाचा कोर्टात निकाल लागला. आरोपी सावकाराला शिक्षा झाल्याचे समाधान आहे. मात्र मुलामुलीचे छत्र हरविले. माझ्या कपाळावरचे कुंकू पुसले गेले. त्याचे दु:ख कायम आहे, अशी वेदनादायी व्यथा मृतकाची पत्नी बेबी येले यांनी मांडली.
१३ मार्च २०१८ रोजी तालुक्यातील सरांडी येथील शेतकरी रोशन काशीनाथ येले (३२) यांनी अवैध सावकारी कर्ज व झालेल्या फसगतीला कंटाळून आत्महत्या केली होती. याप्रकरणी सावकार प्रमोद लालाजी भोयर (३२) रा. हेवती ता. उमरेड याच्याविरुद्ध १८ मार्च २०१८ रोजी गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली. रोशनचा मृत्यू झाला तेव्हा पत्नी बेबी २८ वर्षांची, तर लहान मुलगा इशांत ३ वर्षांचा व मुलगी इशिका ६ वर्षांची होती. या चिमुकल्यांचे छत्र हरविले तर तरुण वयात बेबीच्या कपाळावरील कुंकू पुसले गेले. या घटनेला ३ वर्षे ४ महिने ७ दिवसाचा कालखंड उलटला असताना आज सत्र न्यायालयाने या प्रकरणी आरोपी प्रमोद लालाजी भोयर याला ७ वर्षांची शिक्षा ठोठावली. याबाबत बेबी येले यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी नशिबी आलेले दु:ख वेदना आणि परिश्रमाच्या अश्रूंना वाट मोकळी केली. अवैध सावकाराने गिळंकृत केलेली शेती परत मिळाली. आरोपी सावकाराला शिक्षा झाल्याचे समाधान असल्याचे सांगितले. मात्र चिमुकल्यांचे छत्र हरविले, माझ्या कपाळावरचे कुंकू कायमचे पुसले गेले. हे दु:ख आणि वेदनांची गाठोडी सोबत घेऊन मुलांच्या भविष्यासाठी जगत असल्याचे तिने सांगितले. स्वत:च्या शेतात कष्ट उपसून इतरांच्या शेतात मोलमजुरी करून बेबी आपल्या मुलांना शिकवित आहे. इशांत आता पहिल्या वर्गात तर ईशिका नववीत आहे.
असे आहे प्रकरण?
मृतकाकडे २.५५ हेक्टर आर शेती आहे. अस्मानी संकटाच्या तावडीत शेतात पेरले ते कधी उगवले नाही. त्यामुळे कर्जासह व्याजाचा डोंगर वाढला. त्याच्या परतफेडीसाठी रोशनने आरोपी प्रमोद भोयरकडून व्याजाने ५० हजार रुपये घेतले होते. त्यानंतर वसुलीसाठी तगादा आणि धमकीसत्र सुरू झाले. ही बाब माहीत होताच कुटुंबीयांनी आरोपी प्रमोदशी संपर्क साधून सदर रक्कम व्याजासह परत देण्याची तयारी दर्शविली. मात्र प्रमोद त्यास नकार दिला. आपली शेती सावकाराच्या घशात गेल्याचे लक्षात येताच रोशनने आत्महत्या केली.
सबळ तपास ठरला यशाचे गमक
लोकमतने वृत्तमालिकेतून सर्वप्रथम या प्रकरणाला वाचा फोडली. याची दखल घेत, गुन्हा नोंदवित आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयात सबळ पुराव्यानिशी आरोपपत्र दाखल करण्यात आले. ठाणेदार महेश भोरटेकर यांनी प्रकरणातील साक्षीदारांना प्रॉपर ब्रिफिंग करून न्यायालयात साक्षकामी तयार केले.
200721\img_20210720_190052.jpg
मृतक रोशन येले फोटो