लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नष्ट होत असलेल्या भारतीय भाषांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने व त्या त्या भाषा बोलणाऱ्या नागरिकांनी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन ‘भारतीय भाषांचे भवितव्य’ विषयावरील परिसंवादात बोलणाऱ्या वक्त्यांनी केले. हा परिसंवाद बुधवारी धरमपेठ राजाराम वाचनालयाच्या सभागृहात पार पडला.महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी, भाषा भारती व धरमपेठ राजाराम वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी अध्यक्षस्थानी होते. परिसंवादात सुकुमार चौधरी यांनी बंगाली, डॉ. पी. शिवस्वरूप यांनी तेलुगू, डॉ. विनोद आसुदानी यांनी सिंधी, डॉ. अजहर हयात यांनी उर्दू, डॉ. मनोज पांडे यांनी हिंदी तर, नरेंद्र परिहार यांनी पंजाबी भाषेच्या भवितव्यावर विचार व्यक्त केले. त्यांनी संबंधित भाषांचा इतिहास व सद्यस्थितीवर प्रकाश टाकला. सर्वांचा सूर भाषांचे संरक्षण करण्याकडे होता. देशातील सर्वच भाषा महत्त्वाच्या आहेत. परंतु, काळाच्या ओघात स्थलांतर, दुर्लक्ष, अन्य भाषांचा स्वीकार इत्यादी कारणांमुळे शेकडो भाषा नष्ट झाल्या आहेत. तसेच, अनेक भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. आपापल्या मातृभाषेचे संरक्षण करण्यासाठी घरातूनच प्रयत्न होणे आवश्यक आहे. घरात केवळ मातृभाषेतच संवाद साधला गेला पाहिजे. याशिवाय पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत भाषा शिक्षण अनिवार्य केले गेले पाहिजे. साहित्य निर्मिती हे देखील भाषा वाचविण्याचे प्रभावी माध्यम आहे. त्यातून पुढच्या पिढीपर्यंत भाषेचे वहन होते, असे वक्त्यांनी सांगितले.
नष्ट होत असलेल्या भाषा वाचवा : वक्त्यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 8:34 PM
नष्ट होत असलेल्या भारतीय भाषांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने व त्या त्या भाषा बोलणाऱ्या नागरिकांनी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन ‘भारतीय भाषांचे भवितव्य’ विषयावरील परिसंवादात बोलणाऱ्या वक्त्यांनी केले.
ठळक मुद्देभारतीय भाषांच्या भवितव्यावर परिसंवाद