सावरगाव (नागपूर) : गावातील विकास कामांमध्ये प्रत्यक्ष हितसंबंध जाेपासल्याचा ठपका ठेवत अप्पर जिल्हाधिकारी आशा पठाण यांनी येनीकाेणी (ता. नरखेड) च्या सरपंच उषा मनीष फुके आणि त्यांचे पती उपसरपंच मनीष फुके यांना अपात्र घाेषित केले आहे. विशेष म्हणजे, त्यांच्याच कार्यकाळात येनीकाेणीला राज्य सरकारचा ‘आदर्श गाव’ पुरस्कार प्राप्त झाला आहे.
प्रवीण वासाडे व राजकुमार घाडगे, दाेघेही रा. येनीकाेणी यांनी सरपंच उषा फुके यांच्या तर प्रफुल्ल पंचभाई व वासुदेव गावंडे, दाेघेही रा. येनीकाेणी यांनी उपसरपंच मनीष फुके यांच्या विराेधात अप्पर जिल्हाधिकारी आशा पठाण यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या हाेत्या. गावात पंचायत समितीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकास कामांमध्ये सरपंच व उपसरपंचांनी हितसंबंध जाेपासल्याचा तसेच सरपंचांनी पती उपसरपंचांना लाभ मिळवून दिल्याचा आराेप तक्रारीत केला हाेता.
आशा पठाण यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १४ (१) (ग) (१६) अन्वये २४ मार्च २०२३ राेजी या तक्रारी स्वीकारल्या हाेत्या. आशा पठाण यांनी खंडविकास अधिकारी, नरखेड याच्या मार्फत या प्रकरणाची चाैकशी केली. चाैकशीत आराेप सिद्ध झाल्याचे आढळून आल्याने त्यांनी २ नाेव्हेंबर राेजी त्यांनी निवाडा दिला. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १४ (१)(ग) मधील दिलेल्या तरतुदीनुसार आशा पठाण यांनी सरपंच व उपसरपंच फुके दाम्पत्याला अपात्र घाेषित केले आहे. सुनावणीदरम्यान अर्जदारांकडून ॲड. वीरेंद्र ढगे यांनी तर फुके दाम्पत्याच्यावतीने ॲड. भोजराज धंदाले यांनी युक्तीवाद केला.
२०१८ च्या निवडणुकीत बिनविराेध निवड
सन २०१८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत उषा फुके यांची सरपंचपदी आणि मनीष फुके यांची उपसरपंचपदी बिनविराेध निवड करण्यात आली हाेती. दाेघांनीही ग्रामपंचायत सदस्यांच्या मदतीने गावात केलेली विकास कामे आणि सुधारणांमुळे त्यांच्या कार्यकाळात येनीकाेणीला राज्य सरकारने ‘आदर्श गाव’ पुरस्कार देऊन सन्मानित केले हाेते.
गावातील विकास कामे करताना मी स्वत: कुठलाही वैयक्तिक लाभ घेतला नाही व कुटुंबीयांनाही लाभ दिला नाही. शिवाय, हितसंबंध जाेपासले नाही. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवाड्याच्या विराेधात अप्पर आयुक्तांकडे अपील दाखल करून दाद मागितली आहे.
- मनीष फुके, उपसरपंच, येनीकाेणी