लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : खेड्यापाड्यातील विद्यार्थी तालुकास्थळी शिक्षणासाठी ये-जा करतात. त्यांच्याकरिता एसटी महामंडळाने विद्यार्थी सवलत पासेसची सुविधा उपलब्ध करून दिली. परंतु भिवापूर बसस्थानकावरील पासेस केंद्र गेल्या काही दिवसापासून कुलूपबंद आहे. शाळा सुरू आणि केंद्र बंद असल्यामुळे बस पासेससाठी विद्यार्थ्यांची गैरसाेय हाेत आहे.
भिवापूर येथे तालुक्यातील विद्यार्थ्यांसह भंडारा जिल्ह्यातील पवनी, नीलज, आमगाव, भुयार व चंद्रपूर जिल्ह्यातील कोलारी, मेंढेगाव, साठगाव, जवराबोडी, शंकरपूर आदी गावातील विद्यार्थी शिक्षणाकरिता भिवापूरला ये-जा करतात. यात शालेय विद्यार्थी एसटीने प्रवास करतात. मात्र भिवापूरला येणाऱ्या विद्यार्थ्यांसह प्रवाशांना बसस्थानकावर मोठा त्रास सहन करावा लागतो. यापूर्वी विद्यार्थ्यांना सवलत पास उमरेड आगारातून मिळत होती. दरम्यान, दोन वर्षापूर्वी ही सुविधा भिवापूर बसस्थानकावर उपलब्ध करून दिली. त्यासाठी बसस्थानकात तात्पुरत्या स्वरूपात एक केबिन तयार करून विद्यार्थ्यांना पासेस दिल्या जात हाेत्या. लॉकडाऊनपासून हे पास केंद्र बंद आहे. शाळा सुरू होताच, पास केंद्राची दारे उघडली, मात्र काही दिवसातच ती बंदही झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना सवलत पास मिळणे अडचणीचे झाले आहे. कर्मचारी नसल्याने भिवापूर येथील पास केंद्र बंद असल्याचे समजते.