नागपूर : श्युअरटेक हॉस्पिटलचा वॉर्डबॉय ईश्वर ऊर्फ बिट्टू मंडल याने साथीदारांच्या मदतीने आठवडाभरात १७ रेमडेसिविर इंजेक्शन चोरले. १४ रेमडेसिविरची कथित पत्रकार व औषधी वितरक विकास ऊर्फ लक्ष्मण ढोकणे पाटील याच्या मदतीने विक्री केली. पोलिसांना बिट्टू व विकासच्या माध्यमातून अन्य रुग्णालयांतून वॉर्डबॉयने चोरलेल्या रेमडेसिविरची माहिती मिळाली आहे. या प्रकरणांमध्ये डॉक्टरांच्या भूमिकेबाबत पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.
जरीपटका येथे पोलिसांनी १७ एप्रिल रोजी रेमडेसिविरचे काळाबाजार करणारे रॅकेट पकडले होते. विकास रेमडेसिविरची विक्री करण्यासाठी जात होता. पोलिसांनी मार्टिननगरजवळ त्याला थांबविले. आपले ओळखपत्र दाखवून तो पोलिसांशी अरेरावी करीत होता. पोलिसांनी केलेल्या तपासणीत त्याच्याजवळ दोन इंजेक्शन मिळाले. त्याची चौकशी केल्यानंतर अन्य सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील दोन रेमडेसिविर जप्त केले. या रॅकेटमध्ये आतापर्यंत बिट्टू व विकास यांच्यासोबत धंतोली येथील श्युअरटेक हॉस्पिटलचा वार्डबॉय रोहित धोटे, रजत टेंभरे व मनोज नंदनकर याच्यासोबत लोकमत चौकातील तुलसी मेडिकलचा महेश ठाकरे, रेणुका फार्माचा अमन शिंदे यांना अटक केली आहे. या रॅकेटचा सूत्रधार बिट्टू व विकास आहे. बिट्टू अन्य साथीदारांच्या मदतीने श्युअरटेक हॉस्पिटलमध्ये भरती रुग्णांच्या मेडिसीन किटमधील रेमडेसिविर चोरी करीत होता.
इंजेक्शन विक्री विकास ढोकणे पाटील याच्याकडे होती. बिट्टू व त्याचे साथीदार विकासला १५ ते १७ हजारांत इंजेक्शन उपलब्ध करीत होते. विकास औषध वितरकाबरोबर पत्रकार असल्याचा भासवित असल्याने त्याची औषध विक्रेता व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत ओळखी होती. रुग्णालयातील कर्मचारी गरजवंतांना विकासचा नंबर देत होते. विकास तीन हजार रुपये किमतीचे रेमडेसिविर २३ ते २५ हजारांना विकत होता.
श्युअरटेक हॉस्पिटलचा वाॅर्डबॉय बिट्टू व त्याच्या साथीदारांनी आठवड्याभरात १७ रेमडेसिविर चोरल्याची कबुली दिली आहे. सूत्रांच्या मते, शहरात रेमडेसिविरचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात वाॅर्डबॉयच्या माध्यमातून होत आहे. सीसीटीव्ही कॅमेरे लागले असतानाही रुग्णालय प्रशासनाला या रॅकेटची माहिती नसणे, कुठलीही तक्रार दाखल न करणे या कारणांमुळे पोलीस प्रशासनाचा रुग्णालय व्यवस्थापनावर संशय आहे.
आरोपींकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न
आरोपी वाॅर्डबॉयने रुग्णांच्या मेडिसीन किटमधून रेमडेसिविर चोरल्याची कबुली दिली आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर काळाबाजार करणारे भूमिगत झाले आहेत. आरोपी पोलिसांच्या कस्टडीत आहे. या प्रकरणात डॉक्टर अथवा रुग्णालय प्रशासनाच्या भूमिकेबद्दल चौकशी केल्यावर आरोपींकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय.