विज्ञानामुळे सर्जरीतील कला, नैतिकता हरवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:11 AM2021-03-09T04:11:15+5:302021-03-09T04:11:15+5:30
मेहा शर्मा नागपूर : विज्ञानामुळे सर्जरीमधील कला, अध्यात्म, माणुसकी व नैतिकता हरवली आहे, अशी खंत न्यूरॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे ...
मेहा शर्मा
नागपूर : विज्ञानामुळे सर्जरीमधील कला, अध्यात्म, माणुसकी व नैतिकता हरवली आहे, अशी खंत न्यूरॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. लोकेंद्र सिंग यांनी ‘न्यूरोसर्जरीमधील आव्हाने’ या विषयावरील ऑनलाइन आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये बोलताना व्यक्त केली.
डॉ. सिंग यांनी त्यांचे मार्गदर्शक प्रा. गाझी यासरगील यांचे विचार सांगून सदर भूमिका मांडली. सर्जरीमध्ये नवीन तंत्रज्ञान वापरत असताना सर्जनने स्वत:ला रुग्णाच्या जागेवर ठेवून पाहिले पाहिजे, असे प्रा. यासरगील सांगत असे. त्यामुळे प्रत्येक न्यूरोसर्जननी सर्जरी करण्यापूर्वी हा प्रश्न नेहमी स्वत:ला विचारला पाहिजे. आपण रुग्णाच्या जागेवर असतो तर, असे करू दिले असते का याचा विचार करावा. सर्जन हा केवळ माणूस असून सर्जरीतील गुंतागुंत त्याच्या व्यवसायाचा भाग आहे. त्यामुळे सर्जरी करताना माणुसकीचा विसर पडू देऊ नये असे डॉ. सिंग यांनी सांगितले.
सर्जरी करताना उत्साह टाळल्यास गुंतागुंत निर्माण होणार नाही. सर्जरीपूर्वी संबंधित विषयाचा पूर्ण अभ्यास केला पाहिजे. नवीन सर्जन कार्यशाळेत शिकलेले तंत्रज्ञान वापरण्यासाठी खूप उत्साही असतात. याशिवाय त्यांचा इतरांपेक्षा काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न असतो. त्यातून गंभीर चुका घडतात याकडे सिंग यांनी लक्ष वेधले.
तरुण न्यूरोसर्जन्सना न्यूरोसर्जरीमधील आव्हानांवर बोलण्यासाठी प्रोत्साहित करण्याची वेळ आली होती. त्यामुळे ही परिषद आयोजित करण्यात आली. त्यात तरुण न्यूरोसर्जन आत्मविश्वासाने बोलत असल्याचे पाहून आनंद होत आहे. न्यूरोसर्जरीमध्ये गुंतागुंत नेहमीच असते. येथे चूक करण्यास जागा नाही. हे करियर मॅराथाॅनसारखे आहे. रोज नवीन गोष्टी शिकून अडचणींवर मात करावी लागते. करियरचा विकास करण्याचा हाच मार्ग आहे, असे मत डॉ. सिंग यांनी व्यक्त केले.