मैत्रेय समूहाकडून गंडविलेल्यांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 01:41 AM2017-11-17T01:41:02+5:302017-11-17T01:41:12+5:30

वार्षिक १२ टक्के व्याजाचे आमिष दाखवून राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाºया मैत्रेय समूहाच्या फसवणुकीचा बोभाटा झाल्यानंतर संतप्त गुंतवणूकदारांनी गुरुवारी मैत्रेयच्या कार्यालयासमोर चांगलाच गोंधळ घातला.

The screams of victimized by the Maitreya group | मैत्रेय समूहाकडून गंडविलेल्यांचा आक्रोश

मैत्रेय समूहाकडून गंडविलेल्यांचा आक्रोश

Next
ठळक मुद्देगुंतवणूकदारांचा गोंधळ : वर्षा सतपाळकर, साथीदारांचा शोध सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वार्षिक १२ टक्के व्याजाचे आमिष दाखवून राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाºया मैत्रेय समूहाच्या फसवणुकीचा बोभाटा झाल्यानंतर संतप्त गुंतवणूकदारांनी गुरुवारी मैत्रेयच्या कार्यालयासमोर चांगलाच गोंधळ घातला. अनेक गुंतवणूकदारांनी आक्रोश व्यक्त करीत आपली रक्कम कशी परत मिळेल, असा पोलिसांना सवाल केला. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज दिवसभर या कार्यालयाचा ताबा घेत कागदपत्रांची तपासणी केली.
मुंबईच्या वसईतील रहिवासी असलेल्या वर्षा सतपाळकर ही या समूहाची प्रमुख असून तिचा पती मधुसूदन सतपाळकरने १९८८ मध्ये या कंपनीची निर्मिती केली होती. मधुसूदनच्या मृत्यूनंतर या कंपनीची सर्वेसर्वा झालेल्या वर्षाने लक्ष्मीकांत श्रीकृष्ण नार्वेकर, विजय शंकर तावरे, नितीन चौधरी, जनार्दन अरविंद परुळेकर आणि विजय मिस्त्री आदी साथीदारांच्या मदतीने राज्यातील अनेक मोठ्या शहरात मैत्रेयच्या शाखा उघडून गुंतवणूकदरांना आपल्या जाळ्यात ओढणे सुरू केले. २०१० मध्येच नागपुरात मैत्रेयच्या गोरखधंद्याला सुरुवात झाली होती. येथील पंचशील चौकात प्रारंभी मैत्रेयचे कार्यालय उघडण्यात आले. मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार गळाला लागल्यानंतर मुंजे चौकात फॉर्च्युन मॉलमध्ये कंपनीचे कार्यालय थाटण्यात आले. एक हजाराहून अधिक एजंट नागपूर-विदर्भातील गुंतवणूकदारांना विविध योजनांच्या माध्यमातून आपल्या जाळळ्यात ओढत होते.
त्यांना वार्षिक १२ टक्के व्याजाचे आमिष देत आपली रक्कम जमा करायला लावत होते. जमा ठेव योजना, स्वर्णसिद्धी योजनेत गुंतवणूक केल्यास विशिष्ट अवधीत रक्कम दुप्पट देण्याची हमी दिली जात होती. मैत्रेयच्या या विविध योजनांचे सदस्य झालेल्या गुंतवणूकदारांना धनादेश आणि वचनपत्र दिले जात होते. यासोबतच निर्धारित कालावधीत पैसे, सोन्याची नाणी आणि भूखंड देण्याची हमी दिली जात होती. तीन वर्षांत हजारो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये गोळा करणाºया या कंपनीचे २०१३ मध्ये हळूहळू बिंग फुटायला सुरयवात झाली. कारण कंपनीने गुंतवणूक करणाºयांना त्यांची रक्कम देणे बंद केले. त्यामुळे नागपूरसह राज्यातील इतर शहरातही मैत्रेयच्या शाखात संशयकल्लोळ निर्माण झाला होता. दरम्यान,नाशिक येथे गुंतवणूदारांच्या तक्रारीनंतर वर्षा सतपाळकर आणि जनार्दन अरविंद परुळेकर याला अटक झाल्यानंतर नागपुरातही गुंतवणूकदारांनी धंतोली पोलिसात तक्रार नोंदविली.
पोलिसांनी थंडपणा दाखवल्यानंतर संतप्त गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदविली. प्रदीर्घ तपासानंतर बुधवारी गुन्हा दाखल केला. त्यात वर्षासह लक्ष्मीकांत श्रीकृष्ण नार्वेकर, विजय शंकर तावरे, नितीन चौधरी, जनार्दन अरविंद परुळेकर आणि विजय मिस्त्री यांचा आरोपी म्हणून समावेश करण्यात आला. या सर्वांविरुद्ध महाराष्ट्र गुंतवणूकदार हितसंरक्षक कायदा १९९९ (एमपीआयडी) आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे गुरुवारी वृत्तपत्रातून प्रकाशित होताच संतप्त गुंतवणूकदारांनी आज सकाळपासूनच मैत्रयच्या कार्यालयात धाव घेतली. तेथे पोलीस बंदोबस्त बघून संतप्त गुंतवणूकदारांनी आपला रोष व्यक्त करणे सुरू केले.
काहींनी तोडफोड केली. तर, काहींनी वर्षा व तिच्या साथीदारांच्या नावांनी शिव्या शाप देत आक्रोश चालवला. पोलिसांनी त्यांची कशीबशी समजूत घालून त्यांना दूर ठेवले.
पूर्ण चौकशीनंतर कार्यालयाला सील
दुसरीकडे गुन्हे शाखेच्या पथकाने आज सकाळपासूनच मैत्रेयच्या कार्यालयात धडक देऊन कागदपत्रे, लॉकर, कपाटांची तपासणी केली. सर्वच बनवाबनवी असल्यामुळे काय जप्त करावे आणि काय नको असा प्रश्न पोलिसांसमोर पडला आहे. या प्रकरणात तूर्त चौकशी सुरू असल्यामुळे सध्या काही सांगता येणार नसल्याचे पोलीस उपायुक्त (आर्थिक गुन्हे) श्वेता खेडकर यांनी लोकमतला सांगितले. वर्षा आणि तिच्या साथीदारांचा शोध सुरू तूर्त कार्यालयाला सील केले नसले तरी या कार्यालयावर पोलिसांची २४ तास नजर राहणार असल्याचेही खेडकर म्हणाल्या. संपूर्ण चौकशीनंतरच कार्यालयाला सील लावण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: The screams of victimized by the Maitreya group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.