लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधित गाव-शहरांसाठी सरकार उपाययोजना करीतच आहे. परंतु प्रसार देशभर होऊ नये म्हणून कोरोनाने बाधित नसलेली गाव-शहरे त्वरित सील करावी, अशी सूचना कॉन्फिडन्स पेट्रोलयमचे अध्यक्ष नितीन खारा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरद्वारे केली आहे.आपल्या व्हिडिओ संदेशात खारा यांनी आजमितीस देशात १७० च्या जवळपास कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याचे नमूद केले आहे. हे रुग्ण २० ते २५ शहरातील असल्याचे सांगून, कोरोनाबाधित नसलेल्या गावांपर्यंत ही साथ पसरू नये म्हणून ही सर्व गावे-शहरे सील करण्याची सूचना केली आहे.यासाठी स्वयंसेवी व समाजसेवी संस्थांमधील स्वयंसेवकांच्या चमू तयार कराव्यात. या चमू २४ तास शहरात येणारे ग्रामीण रस्ते, हायवेज, राज्य व राष्ट्रीय महामार्ग, बसस्थानक, रेल्वेस्थानक इत्यादींवर डॉक्टरांच्या चमूसह हजर राहतील व शहरात येणाऱ्यांची कोरोनासाठी तपासणी करतील. शहरातील मळ रहिवासींना शहरात जाण्याची परवानगी असेल, बाहेरगावच्या व्यक्तींना एकतर विलगीकरण कक्षात ठेवले जाईल किंवा परत पाठविले जाईल. कोरोनाबाधित टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्या व्यक्तीला उपचारासाठी पाठविण्यात यावे, असेही त्यांनी सुचविले आहे.अशा पद्धतीने शहरे सील केली तर शाळा, कॉलेज, व्यापार, दुकाने बंद करण्याची आवश्यक्ता राहणार नाही. रोजंदारी कमावणाऱ्या लोकांची रोजीरोटी सुरू राहील आणि बाहेरून येणाऱ्या सर्वांचीच तपासणी झालेली असल्याने कोरोनाबद्दलची भीती राहणार नाही. याच पद्धतीने गाव-खेडी, तालुुका मुख्यालये, जिल्हा मुख्यालयेसुद्धा सील करून कोरोनाचा प्रसार मर्यादित करता येईल. या व्हिडिओ संदेशात खारा यांनी पंतप्रधान व सरकार करीत असलेल्या उपाययोजनांची प्रशंसा केली आहे.
हे तर अनुशासनपर्व - विजय दर्डायाप्रसंगी लोकमतचे चेअरमन व राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डासुद्धा उपस्थित होते. त्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी नागपुरातील पानठेले, चहाची दुकाने, बीअर शॉपी आणि लिकर बार ३१ मार्चपर्यंत बंद केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यामुळे नागरिकांना खर्रा, तंबाखुयुक्त पान, सिगारेट, बिडी, बीअर अथवा मद्य मिळणार नसल्याने त्यांना व्यसनमुक्त होण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. खरेतर या कालावधीला अनुशासनपर्व समजून जनतेने आपली व्यसने सोडावीत व स्वच्छ शहरे व निर्व्यसनी समाज निर्माण करण्यासाठी या संधीचा उपयोग करावा, असे आवाहनही दर्डा यांनी केले आहे.