घरोघरी ‘जय’ ची चर्चा : वन विभागाला लागला घोर नागपूर : वन विभागाने ‘जय’ साठी युद्धपातळीवर शोधमोहीम हाती घेतली आहे. यात वन विभागाने मागील १०० दिवसांत तब्बल ४०० गावांत ‘जय’ चा शोध घेतला असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र तरी अजूनपर्यंत ‘जय’ वन विभागाच्या रडारवर आलेला नाही. हा वाघ मागील तीन महिन्यांपासून उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातून अचानक गायब झाला आहे. वन विभागाने त्याच्या शोधासाठी पाच पथके रवाना केली आहेत. या प्रत्येक पथकात वन विभाग व स्वयंसेवी संस्थांच्या पाच लोकांचा समावेश आहे. ही सर्व पथके दिवसरात्र एक करून ‘जय’ चा शोध घेत आहेत. मात्र अजूनपर्यंत त्यांना यश मिळालेले नाही. दुसरीकडे ‘जय’ गायब झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र खडबडून जागा झाला आहे. व्याघ्र राजधानीत तर घरोघरी ‘जय’ ची चर्चा रंगली आहे. यामुळे ‘जय’ च्या शोधाचे वन विभागावर चांगलेच दडपण वाढले आहे. मागील दोन दिवसांपूर्वी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘जय’ हा नक्की परत येईल, असा आशावाद व्यक्त केला होता. ‘जय’ ला अल्पावधीत प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यामुळे तो गायब होताच एक चर्चेचा विषय बनला आहे. -तर गायब झाला नसता! नागपूर : वन विभाग या वाघाचा युद्धपातळीवर शोध घेत असताना काही वन्यजीव प्रेमींनी त्याची माहिती देणाऱ्यास ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. यामुळे ‘जय’ चा विषय ज्वलंत झाला आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने या वाघावर २४ तास नजर ठेवता यावी, यासाठी त्याला वर्षभरात लाखो रुपयांच्या दोन रेडिओ कॉलर लावल्या. मात्र त्या दोन्ही बंद पडल्या. कदाचित ती रेडिओ कॉलर बंद पडली नसती, तर ‘जय’ हा गायब झाला नसता, असे बोलले जातेय. ‘तो’ गुराख्याला दिसला! शुक्रवारी भंडारा जिल्ह्यातील रावणवाडी परिसरात एका गुराख्याला गळ््यात पट्टा असलेला एक वाघ दिसला असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे वन विभाग तो ‘जय’ असावा असा कयास लावत आहे. मात्र त्यासंबंधी अजूनपर्यंत कोणतेही ठोस पुरावे वन विभागाच्या हाती लागलेले नाहीत. यासंबंधी पवनी येथील विभागीय वन अधिकारी वर्मा यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी गुराख्याच्या माहितीवरून ‘जय’ चा शोध घेतला जात असल्याचे सांगितले. शिवाय ‘जय’ बद्दल ठोस माहिती मिळताच ती मीडियाला दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे मागील १२ जुलै रोजी चिचळा येथील सरपंच मुनिश्वर यांनाही असाच एक गळ््यात पट्टा असलेला वाघ आढळून आला असल्याचे सांगितले जात आहे.
‘जय’ चा ४०० गावांत शोध
By admin | Published: August 01, 2016 1:56 AM