लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दहा महिन्यापासून बंद असलेल्या शाळा जिल्हा प्रशासनाने १४ डिसेंबरपासून सुरू केल्या. पहिल्याच दिवशी १६,१९८ विद्यार्थी अध्यापनासाठी शाळेच पोहोचले. पहिल्या दिवशी शाळेची झालेली यशस्वी सुरुवात लक्षात घेता, त्याचा परिणाम दुसऱ्याच दिवशी दिसून आला. जवळपास चार हजार विद्यार्थ्यांनी घरी न थांबता शाळेत येण्याला पसंती दर्शविली. मंगळवारी शिक्षण विभागाने घेतलेल्या आढाव्यात २०,३१८ विद्यार्थ्यांची नोंद घेण्यात आली.
नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यातील नववी ते बारावीच्या ६४८ शाळा सोमवारी सुरू झाल्या. शाळा सुरू करण्यापूर्वी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खबरदारीच्या उपाययोजना शाळा व जिल्हा प्रशासनाने केल्या होत्या. शाळेने केलेल्या सुरक्षेच्या उपाययोजनांमुळे विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पालकांची आणि विद्यार्थ्यांनी शाळेत येण्याला पसंती दर्शविली. जिल्ह्यात ९ वी ते १२ वी वर्गाचे १,२८,६८९ विद्यार्थी आहेत. दोन दिवसात विद्यार्थ्यांची संख्या चार हजाराने वाढली आहे. शिक्षण विभाग व शाळांच्या नियोजनामुळे लवकरच बहुतांश विद्यार्थी शाळेत परततील, असा विश्वास शिक्षण अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. दरम्यान, मंगळवारी काही शिक्षकांचे कोरोना अहवाल आले. यात १४ शिक्षक पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आढळले. शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर केलेल्या कोरोना तपासणीत ६७ शिक्षक पॉझिटिव्ह आढळले असून, आतापर्यंत ५,१५८ शिक्षकांनी कोरोनाच्या टेस्ट केल्या आहेत.