कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे तिकिटांचे बुकिंग झाले कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 02:08 PM2021-03-04T14:08:46+5:302021-03-04T14:12:10+5:30
Nagpur News जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीत रेल्वे तिकिटांचे बुकिंग कमी झाले आहे. रेल्वे तिकिटांच्या विक्रीत ४० ते ४५ टक्के घट झाल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
आनंद शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरसह विदर्भात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे व्यवसायासह जनजीवनावर त्याचा परिणाम पडला आहे. तसेच रेल्वेचे उत्पन्नही त्यामुळे कमी झाले आहे. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीत रेल्वे तिकिटांचे बुकिंग कमी झाले आहे. रेल्वे तिकिटांच्या विक्रीत ४० ते ४५ टक्के घट झाल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर रेल्वेस्थानक आणि अजनीत ४ ते ५ काऊंटर आहेत. येथे रेल्वे तिकिटांचे बुकिंग करण्यात येते. परंतु मागील महिनाभरापासून प्रवाशांची गर्दी कमी झाली आहे. कोरोनामुळे एका तिकीट काऊंटरवर १२०० पैकी केवळ ६०० फॉर्म येत आहेत. यात फेब्रुवारी महिन्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे ही संख्या आणखीनच कमी होऊन ३०० ते ३५० प्रवासी आरक्षणासाठी येत आहेत. विशेष म्हणजे मुंबई, पुणे, अकोला, शिर्डी येथे तिकिटांचे बुकिंग कमी झाले आहे. यासोबतच दिल्ली, हावडा, विजयवाडा, तिरुपती, बिहारच्या काही शहरात रेल्वे तिकिटांचे बुकिंग कमी झाले आहे. कोरोनामुळे मध्य प्रदेश, दिल्लीसह इतर राज्यांच्यावतीने महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट सक्तीची करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांनी आपला प्रवास टाळण्यास सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम तिकिटांच्या बुकिंगवर होत आहे. याबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी आकडेवारी देण्यास नकार दिला.
तिकिटे होत आहेत रद्द
कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे विविध राज्यात कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह असलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देण्यात येत आहे. यामुळे अनेक प्रवासी प्रवास रद्द करीत आहेत. यामुळे रिफंड घेणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. रिफंड घेणाऱ्या प्रवाशांची संख्या ४० टक्के असल्याची माहिती आहे.
‘नो मास्क, नो तिकीट’कडे दुर्लक्ष
अजनीच्या आरक्षण कार्यालयात ‘नो मास्क, नो तिकीट’ मोहिमेंतर्गत काऊंटरवर मास्क नसलेल्या प्रवाशांना तिकीट नाकारण्यात येत आहे. तर नागपूर रेल्वेस्थानकावर मात्र या मोहिमेची अंमलबजावणी होताना दिसत नाही. रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.
.........