दयानंद पाईकराव।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आईने रागावले, वडील दारू पितात, शाळेत शिक्षकांनी मारले अशा एक ना अनेक कारणावरून अनेक मुलेमुली घर सोडण्याचा विचार करतात. मिळेल त्या रेल्वेगाडीने प्रवास करतात. जानेवारी ते सप्टेबर दरम्यान तब्बल ४१४ मुलामुलींनी घर सोडल्याची धक्कादायक माहिती आहे. हे बालक असामाजिक तत्त्वांच्या हाती लागण्यापूर्वी त्यांना आरपीएफने सुरक्षा कवच पुरवून सुखरुप कुटुंबीयांच्या सुपूर्द केले आहे.लहान मुलांच्या मनावर कोणत्याही गोष्टीचा परिणाम होतो. क्षुल्लक कारणावरून ते घर सोडण्याचा निर्णय घेतात. कोणताच विचार न करता ते रेल्वेत बसून निघून जातात. कुठे जायचे, काय करायचे हे कोणतेच विचार त्यांच्या मनात नसतात. अशा वेळी असामाजिक तत्त्वांची नजर त्यांच्यावर गेल्यास त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होण्याची भीती राहते.अशा साध्या कारणातून जानेवारी ते सप्टेबर या नऊ महिन्याच्या कार्यकाळात ४१४ मुलामुलींनी घर सोडल्याची नोंद रेल्वे सुरक्षा दलाने केली आहे. यात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने नऊ महिन्यात ३१४ मुलामुलींना तर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने १०० मुलामुलींना सुरक्षा कवच पुरविले. अशी बालके आढळल्याबरोबर त्यांची आरपीएफतर्फे आस्थेने विचारपूस करण्यात येते. विश्वासात घेऊन त्यांना घरून निघून येण्याचे कारण विचारतात. आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा अशा मुलामुलींचे समुपदेशन करतात. घरून निघून आलेली मुले आढळल्यानंतर त्याची सूचना रेल्वे चाईल्ड लाईनला देण्यात येते. कुटुंबीय येईपर्यंत या मुलामुलींना रेल्वे चाईल्ड लाईनकडे सोपविण्यात येते. रेल्वेत प्रवाशांना लहान मुले एकटी दिसल्यास १८२ या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे तसेच कुली, आॅटोचालक, व्हेंडर आदींना अशी मुले आढळल्यास आरपीएफला कळविण्याच्या सूचना देण्यात येतात. लहान मुलांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत सुखरुप पोहोचवून आरपीएफने आपल्या कर्तव्यदक्षतेचा परिचय देऊन या बालकांचे आयुष्यही सावरण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
बालकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध‘बालकांच्या सुरक्षेसाठी आरपीएफतर्फे अनेक प्रकारच्या उपाययोजना करण्यात येतात. १८२ हेल्पलाईनवर प्रवाशांनी अशा मुलांची माहिती देण्याचे आवाहन करण्यात येते. व्हेंडर, आॅटोचालकही अशी मुले दिसताच त्याबाबत माहिती देतात.’- ज्योती कुमार सतीजा,वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, आरपीएफ.