नागपूर : सुरक्षेच्या मापदंडांना तिलांजली देत शहरात फटाक्यांची दुकाने थाटली आहेत. त्यामुळे आगीसारखी घटना घडण्याची शक्यता बळावली आहे. बहुतांश दुकानांमध्ये आगीच्या घटनेला सामोरे जाण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. काहीच दुकानदारांनी केवळ औपचारिकता म्हणून पाण्याने भरलेला ड्रम आणि वाळूची बादली ठेवलेली आहे. यंदा ९०० वर दुकानदारांनी फटकाविक्रीच्या परवान्यासाठी मनपाच्या अग्निशमन विभागाकडे अर्ज केले होते. तसेच सुरक्षेच्या उपाययोजना सूचविण्यासाठी वेगळा अर्ज भरून दिला होता. प्रत्येक दुकानदारांना परवान्यासाठी एक हजार रुपयांचा भरणा करावा लागला. त्यावर पोलीस ठाण्यातून संबंधित विक्रेत्याला नाहरकत प्रमाणपत्र मिळाले. मात्र दुकानदारांनी दुकाने थाटताना सुरक्षा मापदंडांना पायदळी तुडवले. दुकानदारांनी सुरक्षेची उपाययोजना केली आहे काय, याबाबतची पाहणी पोलीस आणि अग्निशमन विभागाने करणे आवश्यक आहे. परंतु या दोन्ही विभागांची या दिशेने दिसत नाही. अग्निशमन विभागाचे असे म्हणणे आहे की, दुकानदारांनी सूचनापत्रात नमूद सुरक्षा मापदंडांचे तंतोतंत पालन केले पाहिजे. मापदंडांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यांनी कारवाई केली पाहिजे.कस्तुरचंद पार्क मैदान, जुने पटवर्धन मैदान, छावणी चौक, गांधीबाग परिसर, गांजाखेत चौक, गड्डीगोदाम चौक, जरीपटका, सदर गांधी चौक आदी भागात एका रांगेत फटाक्यांची दुकाने आढळून येतात. याशिवाय गल्लीबोळात, वसाहतींमधील रस्त्यांच्या कडेलाही दुकाने थाटल्या गेली आहेत. त्यापैकी ९० टक्के दुकानांनी सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले आहे. कस्तुरचंद पार्क मैदानात एका रांगेत दुकाने आहेत; परंतु कोणीही अग्निशमन उपाययोजना तयार केलेली नाही. औपचारिकता म्हणून २०० लिटर पाण्याचा ड्रम आणि वाळूची बादली दुकानांसमोर ठेवण्यात आलेली आहे. (प्रतिनिधी)
सुरक्षा मापदंडांना तिलांजली - थाटली फटाक्यांची दुकाने
By admin | Published: October 22, 2014 12:59 AM