नागपूर जिल्ह्यातील भिवापुर बसस्थानकावर विद्यार्थिनींची सुरक्षा धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:56 PM2018-02-24T12:56:11+5:302018-02-24T12:56:28+5:30
भिवापूर तालुक्यातील शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी रोज शिक्षणासाठी भिवापूर येथे बसने ये-जा करतात. खासगी वाहनचालक, वाहन आणि टवाळखोर विद्यार्थिनींच्या अगतिकतेचा फायदा घेत त्यांची छेड काढतात.
शरद मिरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: भिवापूर तालुक्यातील शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी रोज शिक्षणासाठी भिवापूर येथे बसने ये-जा करतात. ते सायंकाळी घरी परत जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करीत बसस्थानक परिसरात उभे असतात. त्यातच खासगी वाहनचालक, वाहन आणि टवाळखोर विद्यार्थिनींच्या अगतिकतेचा फायदा घेत त्यांची छेड काढतात. या गंभीर प्रकारांबाबत पालक पोलिसांत तक्रारी दाखल करीत नसल्याने टवाळखोरांची हिंमत वाढत चालली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील या विद्यार्थिनींच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भिवापूर येथे तालुक्यातील तसेच लगतच्या चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील किमान ३०० विद्यार्थी - विद्यार्थिनी रोज शाळा - महाविद्यालयांमध्ये येतात. सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनी बसने प्रवास करतात. भिवापुरातील बसस्थानक केवळ नावालाच आहे. त्यामुळे या विद्यार्थी - विद्यार्थिनींना रोज नागपूर - गडचिरोली महामार्गाच्या कडेला उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. सायंकाळी या ठिकाणी विद्यार्थी - विद्यार्थिनींची चांगलीच गर्दी असते. त्यात इतर प्रवाशांची भर पडते. या मार्गावर नियमित धावणाऱ्या खासगी वाहनांचे चालक, वाहक तसेच शहरातील व बाहेरचे टवाळखोर विकृत इशारे, अश्लिल शिवीगाळ करीत विद्यार्थिनींना त्रास द्यायला सुरुवात करतात. दोन शालेय विद्यार्थिनी गुरुवारी (दि. २२) सायंकाळी भिवापुरातील बसस्थानक परिसरात उभ्या होत्या. त्यातच तीन तरुणांनी दोघांनीही पाणीपुरी खाण्याच्या निमित्ताने बोलावले. घाबरलेल्या विद्यार्थिनी वेळीच सावध झाल्या आणि त्यांनी हा प्रकार एका दुकानदाराला सांगितला. दुकानदाराने त्या तरुणांना हटकले असता तरुणांनी दुकानदारावरच हात उगारला. त्यामुळे दुकानदाराने पोलिसांची मदत घेतली. परिणामी, दोघांनीही पळ काढला.
पुढे पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत ठाण्यात आणले. विद्यार्थिनींकडून त्यांची ओळखपरेड करवून घेतली. शिवाय, विद्यार्थिनींचे पालकही ठाण्यात दाखल झाले. मात्र, त्यांनी तक्रार नोंदविण्यास असमर्थता दर्शविली. ठाणेदार हर्षल येकरे यांनी विद्यार्थिनी व पालकांना विश्वासात घेत तक्रार करण्याची विनंती केली. परंतु, पालकांनी तक्रार नोंदविली नाही. असेच प्रकार यापूर्वीही घडले आहे. दिवसेंदिवस असल्या प्रकारांमध्ये वाढ होत असल्याने एकीकडे, टवाळखोरांची हिंमत वाढत असून, दुसरीकडे विद्यार्थिनींच्या मनात भीती निर्माण होत आहे. ही बाब निकोप समाजाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे.
बसचालकास चोप
५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी-विद्यार्थिनी बसची प्रतीक्षा करीत उभे होते. बस बरीच उशिरा आल्याने चढण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली. त्यातच चालकाने बस सुरू करून पुढे नेली. त्यामुळे एक विद्यार्थिनी रोडवर पडली. या प्रकारामुळे विद्यार्थी चिडले आणि त्यांनी बसचालकास प्रसाद द्यायला सुरुवात केली. दरम्यान, प्रवाशांनी मध्यस्थी करून बसचालकास सोडविले.
पालकांमध्ये भीती
भिवापूरच्या बसस्थानक परिसरात रोज सायंकाळी ५.१५ वाजतापासून रात्री ८ वाजेपर्यंत विद्यार्थी व विद्यार्थिनी बसची प्रतीक्षा करीत उभे असतात. या काळात विद्यार्थिनींना नको ते अनुभव येतात. या प्रकाराबाबत बहुतांश विद्यार्थिनी भीतीपोटी पालकांना काहीही सांगत नाही. सांगितल्यास पालकाही त्याकडे गांभीर्याने बघत पोलिसांत तक्रार दाखल करत नाही. पोलिसांत तक्रार दाखल केल्यास समाजात आपली व मुलीची बदनामी होईल किंवा टवाळखोर वचपा काढतील, अशी भीती पालकांच्या मनात आहे. तक्रारीअभावी पोलिसांनाही टवाळखोरांविद्ध ठोस कारवाई करता येत नाही.
छोट्या विद्यार्थ्यांचे हाल
तालुक्यातील तास, जवराबोडी, नक्षी, मांगली, मेढा, तातोली, जवळी येथील छोटे विद्यार्थी रोज आॅटोने भिवापूर येथील खासगी कॉन्व्हेंटमध्ये येतात. कमी वेळ, डिझेलची बचत व अधिक कमाई या हव्यासापोटी आॅटोचालक या चिमुकल्यांना आॅटोमध्ये गुरांप्रमाणे कोंबतात. मागील वर्षी आॅटो उलटून काही छोटे विद्यार्थी जखमी झाले होते. हा अनुभव असतानाही या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना केली नाही. हा प्रकार पालक व शाळा व्यवस्थापनाला माहिती असूनही कुणीही गांभीर्याने घेत नाही. हे आॅटो ना शाळेचे आहे ना शासनाचे. मग यांना विद्यार्थ्यांची ने - आण करण्याची परवानगी दिली कुणी, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.