नागपूर जिल्ह्यात बियाण्यांची ५०० कोटींची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2022 08:00 AM2022-07-06T08:00:00+5:302022-07-06T08:00:07+5:30
Nagpur News यंदा नागपूर जिल्ह्यात बियाण्यांची उलाढाल ५०० कोटींची होण्याचा अंदाज आहे.
नागपूर : जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून शेतकऱ्यांनी बियाण्यांची खरेदी सुरू केली. आतापर्यंत ९० टक्के पेरणी झाली असून गेल्यावर्षी जास्त भाव मिळाल्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा कापूस आणि सोयाबीनच्या लागवडीवर जास्त भर आहे. भाववाढ नंतर ही बियाण्यांच्या विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदा नागपूर जिल्ह्यात बियाण्यांची उलाढाल ५०० कोटींची होण्याचा अंदाज आहे.
बियाण्यांच्या किमतीत १५ ते २० टक्के वाढ
बियाण्यांमध्ये ९५ टक्के कापूस आणि ९० टक्के सोयाबीन बियाण्यांची विक्री झाली. त्याखालोखाल तूर आणि धान बियाण्यांची विक्री झाली आहे. शेतकरी बाजारात खरेदीसाठी अजूनही येत आहेतच. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीन, कापसासह मिरची आणि अन्य बियाण्यांच्या किमतीत १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. गेल्यावर्षी कापसाचे ४७५ ग्रॅम पॅकेट ७६० रुपयांना होते. ते यावर्षी ६० रुपयांनी वाढून ८२० रुपये झाले आहे. याप्रमाणे सोयाबीन बियाण्यांची ३० किलोची बॅग ३२०० रुपयांवरून ४ हजार रुपयांवर गेली आहे.
रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम
यावर्षी बियाण्यांसह खतांच्या किमतीतही वाढ झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम खतांच्या दरवाढीवर झाला आहे. युद्धामुळे कच्च्या मालाचा तुटवडा झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात किमती आकाशाला भिडल्या. त्यामुळे स्थानिक बाजारत ही खतांचा तुटवडा दिसून आला. यंदा नागपूर बाजारपेठेत कुणाकडे खत आहे, तर कुणाकडे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त भावात खरेदी करावे लागत आहे. यंदा ५० किलोची बॅग १२५० रुपयांच्या तुलनेत यंदा १३५० रुपयांवर पोहोचली आहे. पोटॅश पासून तयार होणाऱ्या खताच्या किमतीत ५०० रुपयांची वाढ होऊन बॅगची किंमत ११०० रुपयांवरून १६०० रुपयांवर गेली. हे खत रशिया, बेलारूस आणि कॅनडातून येते. पण युद्धामुळे पुरवठा थांबला आहे.
यंदा मिरची पीक कमी होणार
गेल्यावर्षी मिरचीच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ५० टक्के पीक खराब झाले होते. या पिकांवर कीटकनाशकांच्या फवारणीचा काहीही परिणाम झाला नव्हता. त्यामुळे शेतकरी यंदा मिरची पिकाबाबत उत्साहित नाहीत. शिवाय गेल्यावर्षीच्या तुलनेत मिरचीच्या बियाण्यांची मागणी कमी आहे.
पावसामुळे बियाण्यांच्या विक्री वाढली
गेल्या दर जास्त मिळाल्यामुळे यंदाच्या हंगामात कापूस आणि सोयाबीनची पेरणी जास्त झाली आहे. मात्र, धान्याची पेरणी तेवढीच आहे. यंदा बियाण्यांच्या किमतीत वाढ झाल्यानंतरही विक्री वाढली आहे. नागपूर जिल्ह्यातील जवळपास १५०० विक्रेत्यांच्या माध्यमातून बियाणे विकली जातात. सध्या पावसाचा जोर असल्यामुळे ९० टक्के पेरणी आटोपली आहे.
- शरद चांडक, सचिव, नागपूर जिल्हा ॲग्रो डिलर्स असोसिएशन.