घोरपडीसह रानडुकराचे मांस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 11:40 PM2020-07-21T23:40:58+5:302020-07-21T23:42:01+5:30
वनविभागाच्या पथकाने सोमवारी सायंकाळी केलेल्या कारवाईमध्ये घोरपड, रानडुकराचे मांस आणि मृत घुबड आॅटोमधून जप्त करण्यात आले. काटोल रोडवरील घोराड फाटाजवळ करण्यात आलेल्या या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वनविभागाच्या पथकाने सोमवारी सायंकाळी केलेल्या कारवाईमध्ये घोरपड, रानडुकराचे मांस आणि मृत घुबड ऑटोमधून जप्त करण्यात आले. काटोल रोडवरील घोराड फाटाजवळ करण्यात आलेल्या या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रोशन रामराव गणवीर (४३, चिचभवन, वर्धा रोड) व गोलू नेतराम शाहू (२५) यांचा समावेश आहे. कळमेश्वर वनपरिक्षेत्राच्या वनपरिक्षेत्राधिकारी अर्चना नौकरकर व क्षेत्र सहायक एस. एफ . फुलझेले यांना वन्यप्राण्यांची शिकार करून त्यांचे मांस ऑटोमधून (एमएच/४०/२०१०) नागपूरकडे नेले जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीवरून वनविभागाच्या पथकाने घोराड फाट्याजवळ सापळा लावला. संबंधित ऑटो पोहचताच थांबवून तपासणी केली असता ऑटोचालकाच्या सीटखाली तीन प्लास्टिक पिशव्यांमध्ये रानडुकराचे अडीच किलो मांस आढळले. मागील सीटवर मेलेले घुबड आणि जिवंत घोरपड दिसली.
या घटनेतील मुख्य आरोपी गणवीर चिकन सेंटरचा संचालक आहे. गोलू त्याच्या दुकानात काम करतो. उपवनसंरक्षक प्रभूनाथ शुक्ल व एसीएफ प्रज्योत देवबा पालवे यांच्या सूचनेवरून आरोपींच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी सकाळी दोन्ही आरोपींना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना २३ जुलैपर्यंत फॉरेस्ट कस्टडी रिमांड सुनावला आहे. ही कारवाई व्ही. एन. कोल्हे, डी.एल. खरबडे, आर. धुर्वे, बी.एस. बोरकर, आर. एम. मोहब्बे व श्रावण यांच्या पथकाने पार पाडली.
घोरपडीची नखे कापलेली
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपड जिवंत असली तरी आरोपींनी तिची नखे अत्यंत क्रूरपणे कापलेली होती. यामुळे जखमी घोरपडीला उपचारासाठी सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.