लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत मागील काही काळापासून एमडी तस्करीचे प्रमाण वाढले असून पोलिसांच्या ढिसाळ धोरणामुळे त्यांची हिंमतदेखील वाढली आहे. एका तरुणाला एमडी पावडर विकण्यासाठी दबाव आणताना आरोपींनी पहाटे त्याला धमकी दिली. माऊझरचा धाक दाखवत एमडी विक्री केली नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली. तर एका तरुणाचे घर जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून पोलिसांचा वचक राहिला आहे की नाही असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
वेदांत विकास ढाकुलकर (२४, फुल मार्केटजवळ) असे तक्रारदाराचे नाव आहे. शुक्रवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास आरोपी मृणाल मयूर गजभिये (२८, आनंदननगर, सिताबर्डी), अमन अनिल मेश्राम (२९, सोमवारी क्वॉर्टर्स) व निखील संतोष सावडिया (२४, टेकडी लाईन, सिताबर्डी) हे वेदांतच्या घरासमोर पोहोचले. त्यांनी बाहेर उभ्या असलेल्या मोटारसायकलमधून पेट्रोल काढले व ते कापडावर टाकून आग लावत तो टेंभा वेदांतच्या घरावर फेकला. शिवीगाळ करत त्याला ठार मारण्याची धमकी देत आरोपी तेथून निघून गेले. अर्ध्या तासाने ते त्याच परिसरात राहणाऱ्या यश किशोर तिवारी (२८) याच्या घरासमोर पोहोचले. तेथे त्यांनी त्याच्या घराच्या दरवाजाल लाथा मारून आरडाओरड केली. यशला शिवीगाळ करत त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. जर आमच्यासाठी एमडी विक्री केली नाही तर दर महिन्याला आम्हाला १० हजारांचा हफ्ता दे असे मृणालने म्हटले. यशने खिडकीतून पाहिले असता मृणालच्या हातात माऊझर होते. त्यामुळे तो घराबाहेर निघालाच नाही. आरडाओरड करत आरोपी तेथून निघून गेले. वेदांत व यशच्या वेगवेगळ्या तक्रारींवरून धंतोली पोलीस ठाण्यात तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे.