रात्री मेडिकलवर वरिष्ठांची नजर : अधिष्ठात्यांनी तयार केले ‘टाइमटेबल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:11 AM2019-04-28T00:11:21+5:302019-04-28T00:13:16+5:30
मेडिकलमध्ये रात्री ‘मास कॅज्युल्टी’आल्यास, रुग्णसेवेबद्दल तक्रारी असल्यास आणि इतरही सोयींच्या व्यवस्थापनेसाठी अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी सहा वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सहा दिवसांचे ‘टाइमटेबल’ तयार केले आहे. प्रत्येक रात्रीची जबाबदारी सोपविण्यात आल्याने रात्रीचे प्रश्न रात्रीच सुटण्याची व रुग्णांना अधिक चांगली रुग्णसेवा मिळण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेडिकलमध्ये रात्री ‘मास कॅज्युल्टी’आल्यास, रुग्णसेवेबद्दल तक्रारी असल्यास आणि इतरही सोयींच्या व्यवस्थापनेसाठी अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी सहा वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सहा दिवसांचे ‘टाइमटेबल’ तयार केले आहे. प्रत्येक रात्रीची जबाबदारी सोपविण्यात आल्याने रात्रीचे प्रश्न रात्रीच सुटण्याची व रुग्णांना अधिक चांगली रुग्णसेवा मिळण्याची शक्यता आहे.
विदर्भासह आजूबाजूच्या चार राज्यातून मेडिकलमध्ये रुग्ण येतात. अलीकडे रात्री येणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. यामुळे रात्रीचे व्यवस्थापन करण्यासाठी डॉ. मित्रा यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी सोपविली आहे. हे अधिकारी ‘ऑन कॉल’ राहणार आहेत. मात्र रात्री कुठलीही मोठी घडामोड घडल्यास त्याला जबाबदार संबंधित अधिकाऱ्यांवर असणार आहे. यासंदर्भात २६ एप्रिल रोजी डॉ. मित्रा यांनी संबंधित डॉक्टरांच्या नावाने अधिकृत पत्र काढले. शनिवारपासून या सेवेला सुरुवातही झाली आहे. रात्री ८ ते सकाळी ८ अशी १२ तास वैद्यकीय अधिकारी आपली सेवा देणार आहे. रुग्णांच्या समस्यांचे निरसन करून त्यांना मदत करण्याचे मुख्य कार्य या डॉक्टरांकडे राहणार आहे. डॉ. मित्रा यांनी प्रथमच रात्रपाळीचा प्रयोग मेडिकलमध्ये सुरू केल्यामुळे निश्चितच रुग्ण व नातेवाईकांच्या समस्या सुटण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
तत्काळ समस्येचे निदान व्हावे
मेडिकलमध्ये रात्री रुग्णसेवेचे व्यवस्थापन योग्य व्हावे, तत्काळ समस्येचे निदान व्हावे आणि इतरही कार्यासाठी सहा दिवस सहा ‘मेडिकल ऑफिसर’ यांची ड्युटी लावण्यात आली आहे. हे अधिकारी त्या त्या दिवशी घडलेल्या घटनेला जबाबदार असतील.
-डॉ. सजल मित्रा
अधिष्ठाता, मेडिकल