नागपुरात कोळशाने भरलेल्या वॅगनला आग लागल्यामुळे खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 12:10 AM2018-01-30T00:10:09+5:302018-01-30T00:11:25+5:30
प्लॅटफार्म क्रमांक ८ शेजारील लूप लाईनवर उभ्या असलेल्या कोळशाने भरलेल्या मालगाडीच्या एका वॅगनला सोमवारी दुपारी २ वाजता आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. वेळीच रेल्वे कर्मचाऱ्यांनी ही आग विझवल्यामुळे अनर्थ टळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्लॅटफार्म क्रमांक ८ शेजारील लूप लाईनवर उभ्या असलेल्या कोळशाने भरलेल्या मालगाडीच्या एका वॅगनला सोमवारी दुपारी २ वाजता आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. वेळीच रेल्वे कर्मचाऱ्यांनी ही आग विझवल्यामुळे अनर्थ टळला.
पूर्वेकडील होम प्लॅटफॉर्म क्रमांक ८ च्या शेजारी असलेल्या लूप लाईनवर एक कोळशाने भरलेली मालगाडी उभी होती. सोमवारी दुपारी २ वाजता या मालगाडीच्या एका वॅगनमधील कोळशातून आगीच्या ठिणग्या आणि धूर निघताना दिसला. लागलीच रेल्वेस्थानकावरील कर्मचाऱ्यांनी या वॅगनवर पाणी मारून लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरून रेल्वेगाड्यांचे आवागमन सुरू होते. त्वरित उपाययोजना केल्यामुळे मोठी हानी टळली. आग विझविल्यानंतर मालगाडीपासून आग लागलेली वॅगन रुळावरून काढून यार्डात पाठविण्यात आली.