लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचे अपहरण झाल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. अपहरणकर्त्याने १० लाख रुपयांच्या खंडणीसाठी शिपायाला फोन केला होता. पण सुदैवाने मुलगा सुखरूप घरी परतल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान अपहरण झाल्या संदर्भात पोलीस शिपायाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
एरवी व्यापारी, व्यावसायिकांच्या मुलांचे अपहरण करून खंडणी मागण्याचे प्रकार घडताना आपण बघितले. पण नागपूर शहरात पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचे अपहरण करून खंडणी मागितल्याची घटना घडल्याने पोलीस यंत्रणाच हादरली होती. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस वसाहतीत राहणारे वाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कमलेश जावडीकर यांचा १२ वर्षीय मुलगा सार्थक याचे अपहरण करण्यात आले. शुक्रवारी दुपारच्या सुमारास सार्थक वसाहतीत खेळत होता. दरम्यान ३ ते ४ अनोळखी इसमांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याला बोलाविले. त्याला मारोती व्हॅनमध्ये कोंबून पळवून नेले. दरम्यान त्याच दिवशी पोलीस कर्मचारी कमलेश जावडीकर यांना फोन आला. १० लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. अन्यथा मुलाला मारण्याची धमकीही दिली. पण सुदैवाने मुलगा परत आला आणि पोलीस यंत्रणेने सुटकेचा श्वास सोडला. परंतु अपहरणाच्या संदर्भात सार्थकची आई पल्लवी कमलेश जावडीकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.