निशांत वानखेडे
नागपूर : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयातर्फे ओबीसी, ईबीसी व डिएनटीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी २९ सप्टेंबरला होणारी ‘यशस्वी प्रवेश चाचणी’ अचानक रद्द करण्याची घोषणा नॅशनल टेस्टींग एजेन्सी (एनटीए) ने बुधवारी पत्रकाद्वारे केली. विशेष म्हणजे २२ सप्टेंबरला परीक्षेची जाहिरात देण्यात आली आणि चार दिवसात २६ सप्टेंबरला परीक्षा रद्द करण्याचे पत्रक काढण्यात आले. त्यामुळे शिष्यवृत्तीसाठी या परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय विभागातर्फे इतर मागासवर्ग (ओबीसी), आर्थिकदृष्टी मागास (ईबीसी) व डिएनटीच्या ईयत्ता ९ व १० आणि ईयत्ता ११ व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ‘यंग अचिव्हर्स अवार्ड स्कॉलरशीप’ गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आली आहे. ही शिष्यवृत्ती प्राप्त करण्यासाठी ईयत्ता ८ वी आणि ईयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना ‘यशस्वी एन्ट्रंस टेस्ट’ गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आली. एनटीएद्वारे ही प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहे. ही परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ९ व १० वीत प्रतिवर्षी ७५ हजार आणि ११ व १२ वीच्या पात्र विद्यार्थ्यांना १ लाख २५ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. हीच प्रवेश परीक्षा २९ सप्टेंबरला होणार होती व २२ सप्टेंबरला तसे पत्रक काढण्यात आले. मात्र चारच दिवसात पुन्हा परीक्षा रद्द करण्याचे पत्रक एनटीएने काढले आहे. त्यामुळे एनटीएचा काय सावळा गोंधळ चालला आहे, असा सवाल शाळांकडून केला जात आहे.
विद्यार्थ्यांवर दडपण नको म्हणून
एनटीएच्या पत्रकानुसार यशस्वी प्रवेश परीक्षेऐवजी विद्यार्थ्यांच्या ८ वी व १० वीच्या गुणांच्या आधारावरच ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ६० टक्क्यांच्यावर गुण असलेल्या विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज द्यायचा आहे. त्यानंतर नॅशनल स्कॉलरशीप पाेर्टलवरून विद्यार्थ्यांची निवड होईल, असे पत्रकात नमूद आहे. विद्यार्थ्यांवर आणखी एका परीक्षेचे दडपण नको म्हणून ही परीक्षा रद्द केल्याचे सुत्रांनी सांगितले.
याआधीही दोन योजनेचा परीक्षा बंद
केंद्र सरकारने यापूर्वी अशाचप्रकारे नॅशनल टॅलेंट सर्च (एनटीएस) परीक्षा व किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना सुरू केली होती. मात्र दोन वर्षापूर्वी या दोन्ही योजना बंद झाल्या असल्याची माहिती सुत्रांनी दिली. आता ही तिसरी योजना बंद करण्याचे प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
आमच्या शाळेत १८ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते व त्यांनी कसून तयारी केली हाेती. मात्र अचानक ही परीक्षा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांवर दडपण येत असल्याचे कारण दिले जाते, तर मग परीक्षाच कशाला जाहीर केली? काय करावे याबाबत सरकार स्वत:च संभ्रमात असल्याचे दिसते.
- सैयद मकसूद पटेल, मुख्याध्यापक, उर्दू हायस्कूल, यवतमाळ