नागपुरातील सीताबर्डी नो पार्किंग झोन वादावर तोडगा काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 10:20 PM2018-03-08T22:20:46+5:302018-03-08T22:21:00+5:30
सीताबर्डीतील व्हेरायटी चौक ते लोहापूल रोडला नो पार्किंग झोन घोषित करण्यात आले असून, यासंदर्भातील अधिसूचनेला सीताबर्डी मर्चंटस् असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. न्यायालयाने गुरुवारी वाहतूक पोलीस विभागाला संबंधित पक्षांचे म्हणणे ऐकून या वादावर सर्वमान्य तोडगा काढण्याचा आदेश दिला. तसेच, यावर येत्या सोमवारपर्यंत अहवाल देण्यास सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सीताबर्डीतील व्हेरायटी चौक ते लोहापूल रोडला नो पार्किंग झोन घोषित करण्यात आले असून, यासंदर्भातील अधिसूचनेला सीताबर्डी मर्चंटस् असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. न्यायालयाने गुरुवारी वाहतूक पोलीस विभागाला संबंधित पक्षांचे म्हणणे ऐकून या वादावर सर्वमान्य तोडगा काढण्याचा आदेश दिला. तसेच, यावर येत्या सोमवारपर्यंत अहवाल देण्यास सांगितले.
वाहतूक पोलीस विभागाला सर्वमान्य तोडगा शोधण्यासाठी याचिकाकर्ते, हॉकर्स व महानगरपालिका यांचे म्हणणे ऐकून घेण्याची सूचना करण्यात आली आहे. वाहतूक पोलीस विभागाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून त्यांना मोटर वाहन कायद्यांतर्गत नो पार्किंग झोनचा निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचे मान्य केले व हा निर्णय मुंबई पोलीस कायद्यांतर्गत घेण्यात आल्याची माहिती दिली. दरम्यान, न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता, व्हेरायटी चौक ते लोहापूल रोडवर हॉकर्समुळे कोंडी होत असल्याचे निरीक्षण नोंदवून वरीलप्रमाणे आदेश दिला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
वादग्रस्त अधिसूचना ३ मार्च रोजी जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमुळे व्यवसाय बुडत असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. संबंधित रोड ६० फुटाचा व वन वे असल्यामुळे वाहतूक कोंडी होत नाही, असा दावाही त्यांनी केला आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली.