रेवराल : परमात्मा एक सेवकच्या वतीने माैदा शहरात दरवर्षी २६ जानेवारी राेजी सेवक संमेलनाचे आयाेजन केले जाते. काेराेना संक्रमण लक्षात घेता यावर्षी सेवक संमेलन रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार प्रशांत सांगडे व माैदाचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांनी संयुक्तरीत्या दिली.
या संमेलनाच्या आयाेजनाबाबत निर्णय घेण्यासाठी माैदा शहरात बैठकीचे आयाेजन करण्यात आले हाेते. या संमेलनाला दरवर्षी महाराष्ट्रासह अन्य राज्यांमधून हजाराे सेवक हजेरी लावतात. काेराेना संक्रमण लक्षात येता आयाेजकांनी संमेलनाच्या आयाेजनाची जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली हाेती. काेराेना संक्रमणाचा धाेका पूर्णपणे टळला नाही. संमेलनात सेवकांची माेठी गर्दी हाेणार असल्याने ती गर्दी काेराेना संक्रमणाच्या पथ्यावर पडणारी ठरू शकते. त्यामुळे यावर्षी परमात्मा एक सेवक संमेलनाला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. त्यामुळे सेवकांनी माैदा येथील आश्रमात येऊ नये. आश्रमाच्या परिसरात २६ जानेवारी राेजी संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. या बैठकीला तहसीलदार प्रशांत सांगडे, ठाणेदार हेमंतकुमार खराबे, परमात्मा सेवक मंडळाचे अध्यक्ष राजू मदनकर यांच्यासह सेवक उपस्थित हाेते.