नागपूर - अॅक्टीव्हाच्या हुकला अडकवून हॉटेलमध्ये नाश्ता करणाऱ्यांची सात लाखांची रोकड असलेली बॅग चोरट्याने लंपास केली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौ-याच्या निमित्ताने शहरात सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त असताना गणेशपेठमध्ये शुक्रवारी दुपारी ही संशयास्पद बॅग चोरीची घटना घडली. त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे.
लक्ष्मीकांत सिताराम जांगीर (वय ३७) हे वर्धा मार्गावरील मेहाडीया भवनात राहतात. त्यांनी गणेशपेठ पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, जांगिर यांच्या पत्नीने त्यांना एका बॅगमध्ये ७ लाखांची रोकड भरून दिली. ही रोकड त्यांना महालमधील एका व्यक्तीला द्यायची होती. जांगिर यांच्यासोबत रवी अशोक कल्लमवार (वय ३४, रा. निर्मल कॉलनी, जरीपटका) आणि शेख सरफराज उर्फ राजा गुलामनबी खान (वय २५, रा. महेंद्रनगर, रहेमान मस्जिदजवळ) हे दोघे होते. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिटणीस पार्कजवळ एक नमकीन सेंटर आहे. दुपारी ३.१५ वाजता त्या नमकीन सेंटर समोर या तिघांनी आपली अॅक्टीव्हा लावली आणि नाश्ता करायला गेले. नाश्ता करून परतल्यानंतर त्यांना अॅक्टीव्हाला अडकवून असलेली सात लाखांची रोकड असलेली बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आले. जांगिर यांनी आरडाओरड करून गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.असा कसा सहजपणा ?या धाडसी चोरीने अनेक शंका निर्माण केल्या आहेत. जांगिर यांच्या घरून घटनास्थळाचे अंतर दुचाकीने जास्तीत जास्त १५ मिनिटांचे आहे. तर, तेथून महाल हे अंतर पाच मिनिटांचे आहे. घरून निघाल्यानंतर एवढ्या वेळेत त्यांना नाश्ता करण्याची गरज भासली. दुसरे म्हणजे, तिघे जण ही रक्कम घेऊन जात असताना त्यांनी एवढी मोठी रोकड असलेली बॅग दुचाकीला बाहेर लटकवून कशी ठेवली, त्यांनी ती सोबत का नेली नाही, असाही प्रश्न संशय वाढवत आहे. लवकर नाश्ता करून येऊ, असे सहजपणे वाटल्याने त्यांनी ती रोकड दुचाकीला अडकवून ठेवल्याचे सांगितले आहे. मात्र, हा सहजपणा खटकणारा आहे, असे पोलीस म्हणतात.