शरद पवारांनी विदर्भ राज्यासाठी सार्वमत घ्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 11:46 PM2018-03-07T23:46:00+5:302018-03-07T23:46:21+5:30
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळ्या विदर्भ राज्याचा चेंडू जनतेच्या दिशेने टोलविला आहे. जनतेचे नेमके मत जाणून घेण्यासाठी पवार यांनीच पक्षाच्या माध्यमातून वेगळ्या विदर्भ राज्यासाठी सार्वमत घ्यावे, असे आवाहनच ‘जनमंच’चे अध्यक्ष प्रा.शरद पाटील यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळ्या विदर्भ राज्याचा चेंडू जनतेच्या दिशेने टोलविला आहे. जनतेचे नेमके मत जाणून घेण्यासाठी पवार यांनीच पक्षाच्या माध्यमातून वेगळ्या विदर्भ राज्यासाठी सार्वमत घ्यावे, असे आवाहनच ‘जनमंच’चे अध्यक्ष प्रा.शरद पाटील यांनी केले आहे. जनतेची इच्छा असेल तर विदर्भ वेगळे राज्य करायला माझी काहीच हरकत नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांअगोदर वक्तव्य केले होते हे विशेष.
‘जनमंच’ने डिसेंबर २०१३ मध्ये नागपूर शहरात जनमत चाचणी घेतली होती व ६ लाखांपैकी ९७ टक्के लोकांनी वेगळ्या विदर्भाच्या बाजूने कौल दिला होता. विदर्भ राज्य आंदोलन समितीने चंद्रपूरला घेतलेला सार्वमतातदेखील असाच कौल मिळाला होता. तरीदेखील पवार यांना वेगळ्या विदर्भाची मागणी ही मूठभर हिंदीभाषिकांची वाटते. त्यांचा या चाचण्यांवर विश्वास नव्हता. त्यामुळे आता त्यांनी विदर्भात पारदर्शक पद्धतीने सार्वमत चाचणी घ्यावी. विदर्भवादीदेखील त्याला निश्चित सहकार्य करतील, असे प्रा.पाटील यांनी प्रतिपादन केले. या सार्वमतातून जो काही कौल येईल तो सर्व विदर्भवादी संघटना मान्य करतील. जनतेने जर वेगळ्या विदर्भाच्या विरोधात कौल दिला तर आम्ही ही मागणी कायमची सोडून देऊ. परंतु जर जनतेचा कौल विदर्भाच्या बाजून आला तर पवारांना तो मान्य करावा लागेल व तशी भूमिका जाहीर करावी लागेल, असे आव्हानच प्रा.पाटील यांनी दिले.