धीरज ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वकाही सहज मिळते, त्यांना नक्कीच नशीबवान समजायला हरकत नाही. कारण या जगात स्वत:चं अस्तित्व निर्माण करायला काही वर्षांचे तप करावे लागते. कष्टाच्या, मेहनतीच्या अग्निकुंडात स्वत:चं जीवन समर्पित करून जिद्दीने शिखर गाठावे लागते, अशीच कहाणी विजया प्रभाकरराव देशमुख यांची आहे.‘मुली शिकवा-मुली वाचवा’ असा संदेश सोपा वाटत असला तरी प्रत्यक्ष कृतीत उतरविताना तारेवरची कसरतच असते’, हे विजया देशमुख यांनी अनुभवले. पती प्रकाश देशमुख यांच्या अपघाती निधनानंतर विजया देशमुख यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. चार मुली आणि स्वत: एकटी स्त्री. या पुरुषप्रधान जगात जगायचे कसे, मुलींचे शिक्षण आणि संसाराचा गाडा कसा चालवायचा, असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे झाले. पहिली मुलगी पाचवीत तर शेवटची फक्त चार वर्षांची. घरी ३१ एकर शेती, पण शेतीची धुरादेखील कधी बघितली नाही.शिक्षण एम.ए. (इतिहास). कुटुंबातील मंडळी म्हणायची, आम्ही मुली सांभाळतो, तू दुसरे लग्न कर. पण आपल्या पोरी पोरक्या होतील, अशी भीती होती. आता निर्णय घेण्याची वेळ होती. स्वत:च्या मुलींचा सांभाळ करण्याची जबाबदारी पेलायची होती. शिक्षण समोर केले तरी, नोकरीसाठी मुलींना सोडून जावे लागेल म्हणून शेती हाच एकमेव पर्याय होता. मुलींना शिकवायचेच, अशी मनात खूणगाठ बांधून पदर कसला. शेती कसायची कशी माहिती नव्हते परंतु परिस्थिती सर्व शिकविते.जिद्दीने आणि हिमतीने शेती केली. आज माझी शेती उत्कृष्ट आहे. १५०० झाडांची बाग निर्माण केली. स्वत:च्या मालकीचे घर उभे झाले. मोठी मुलगी क्रांती देशमुख (बी.ई. सिव्हिल), आवृत्ती देशमुख (बी.ई. मेकॅनिकल) बडोदा, गुजरात येथे नोकरीला आहे. तिसरी श्रुती बी.एस्सी. करीत आहे तर लहान तृप्ती अकरावीला शिकत आहे.हे सांगताना विजया देशमुख म्हणाल्या, आत्मविश्वासाने अस्तित्वाची लढाई लढत गेले. प्रामाणिकपणे मेहनत घेतली की, निसर्गदेखील साथ देतो. त्यामुळेच आज माझं अस्तित्व निर्माण करू शकले.
जिद्दीने घडविले चार मुलींचे भविष्य; ‘तिच्या’ अस्तित्वाची पाऊलवाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 12:10 PM
कष्टाच्या, मेहनतीच्या अग्निकुंडात स्वत:चं जीवन समर्पित करून जिद्दीने शिखर गाठावे लागते, अशीच कहाणी विजया प्रभाकरराव देशमुख यांची आहे.
ठळक मुद्दे‘मुली शिकवा-मुली वाचवा’ असा संदेश सोपा वाटत असला तरी प्रत्यक्ष कृतीत उतरविताना तारेवरची कसरतच असते’