ती म्हणाली, 'ही'च माझा नवरा ! उंचावल्या साऱ्यांच्याच भुवया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 07:00 AM2020-09-06T07:00:00+5:302020-09-06T07:00:06+5:30

पोलीस म्हणाले, बोलवा तुमच्या नवऱ्यांना. काही क्षण एकमेकींकडे बघून एक म्हणाली 'हीच माझा नवरा!' तिचे वाक्य तिच्या आईवडिलांसह पोलिसांनाही चक्रावून टाकणारे ठरले.

She said, 'This is my husband! Raised eyebrows of all | ती म्हणाली, 'ही'च माझा नवरा ! उंचावल्या साऱ्यांच्याच भुवया

ती म्हणाली, 'ही'च माझा नवरा ! उंचावल्या साऱ्यांच्याच भुवया

Next
ठळक मुद्देपोलीस म्हणाले बोलवा तुमच्या नवऱ्याला

नरेश डोंगरे 
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तारुण्याच्या उंबरठ्यावर पाय ठेवताच त्या दोघींनी घराचा उंबरठा ओलांडला. इकडे सुस्वरूप मुलगी बेपत्ता झाल्याने दोघींचेही आईवडील कावरेबावरे झाले. लाडक्या मुलीचे काही बरेवाईट होण्यापूर्वी त्यांना शोधून द्या, अशी साद त्यांनी पोलिसाना घातली. पोलिसांनीही तत्परता दाखवत धावपळ सुरू केली. अखेर त्या दोघींचा छडा लागला. गुरुवारी रात्री त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्या दोघींनी आपण लग्न केल्याचे पोलिसांना सांगितलं. पोलीस म्हणाले, बोलवा तुमच्या नवऱ्यांना. काही क्षण एकमेकींकडे बघून एक म्हणाली 'हीच माझा नवरा!' तिचे वाक्य तिच्या आईवडिलांसह पोलिसांनाही चक्रावून टाकणारे ठरले.

एखाद्या पाश्चिमात्य सिनेमातील वाटावा, अशा या घटनाक्रमातील वास्तव पात्र रंगवणारी मनिषा लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तर दुसरी कल्पना (दोघींचीही नावे काल्पनिक) पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे.
मनिषा १८ वर्षे १५ दिवस वयाची तर कल्पनाचे वय १८ वर्षे १० दिवस. दोघीही बारावी झालेल्या. आठ महिन्यापूर्वी मनिषाच्या नातेवाईकाकडे झालेल्या लग्नात या दोघी पहिल्यांदा भेटल्या. त्यांनी एकमेकींचे मोबाईल नंबर एक्सचेंज केले. नंतर फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्या दोघी तासन्तास कनेक्ट रहायच्या. नंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आणि त्यांनी 'जिना मरना तेरे संग' असा संकल्प केला. दोन महिन्यांपासून त्या रिलेशनशिपमध्ये आल्या. आपले वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे याची त्यांना जाणीव होती त्यामुळे त्यांनी धीर धरला. १८ वर्षे पूर्ण होताच या दोघींनी आठ दिवसापूर्वी घरातून पलायन केले. सुस्वरूप मुलगी घरून निघून गेल्यामुळे आईवडील सैरभैर झाले. इकडेतिकडे शोधूनही मुलगी मिळत नसल्याचे पाहून शंकाकुशंकाचे वादळ आईवडिलांच्या मनात घोंगावू लागले. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलींना शोधून द्या, अशी आर्त साद पोलिसांना घातली. पोलिसांनीही तेवढ्याच संवेदनशीलतेने साद दिली.

मोबाईल नंबर आणि फेसबुकच्या माध्यमातून या दोघीचे लोकेशन ट्रेस केले. गुरुवारी त्या कामठी मार्गावर असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्याने तेथून या दोघींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना लकडगंज ठाण्यात आणण्यात आले. दोघींच्या आईवडिलांनाही कळविण्यात आले. ठाणेदार नरेंद्र हिवरे यांनी विचारपूस सुरू केली. पहिल्याच प्रश्नात या दोघींनी तडक 'आम्ही लग्न केले आहे', असे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना 'ठीक आहे, बोलवा तुमच्या नवऱ्यांना', असे म्हटले. त्यानंतर मनिषाने कल्पनाकडे बोट दाखवून 'हीच माझा नवरा', असे म्हटले. कल्पनानेही मनिषा आपली बायको असल्याचे सांगितले.

पलायन नाट्यातून त्यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे या दोघींचे आईवडीलच नव्हे तर पोलिसांनाही आपली खुर्ची सोडण्यास भाग पाडले. आम्ही सज्ञान असून आम्ही एकमेकींना नवरा-बायको म्हणून जीवनसाथी स्वीकारले आहे, असे त्या पोलिसांपुढे म्हणाल्या. त्यांचा एकूणच बाणा आणि कायद्याची चौकट ध्यानात घेऊन पोलिसांनी त्या दोघींना समजवण्याचा प्रयत्न केला. त्या ऐकत नसल्याचे पाहून दोघींना त्यांच्या त्यांच्या आईवडिलांच्या स्वाधीन करून पोलीस आपल्या कामी लागले.

 

Web Title: She said, 'This is my husband! Raised eyebrows of all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.