ती एकटीच निघाली प्रवासाला, पर्यावरण संवर्धनाच्या जागराला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:06 AM2020-12-23T04:06:35+5:302020-12-23T04:06:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रामसेतूचा उदात्त हेतू साधण्यासाठी इवलीशी खारूताई वाळूने माखलेले आपले अंगही झटकत होती. वानरांना तो ...

She set out on a journey alone, to awaken the environment | ती एकटीच निघाली प्रवासाला, पर्यावरण संवर्धनाच्या जागराला

ती एकटीच निघाली प्रवासाला, पर्यावरण संवर्धनाच्या जागराला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : रामसेतूचा उदात्त हेतू साधण्यासाठी इवलीशी खारूताई वाळूने माखलेले आपले अंगही झटकत होती. वानरांना तो हसण्याचा विषय ठरला. मात्र, योगदान महत्त्वाचे ठरले. नेमकी तीच भावना हृदयाशी बाळगत यवतमाळची अशीच एक खारूताई पर्यावरण संवर्धनासाठी अवघा महाराष्ट्र पालथा घालण्याचे ध्येय बाळगून एकटीच नागपुरात आली आहे. आतापर्यंत तिने सायकलवरून १३०० किमीचे अंतर कापले आहे आणि पुढे आणखी हजारो किमी अंतर कापायचे आहे.

पर्यावरण संवर्धनाचा जागर घराघरात निर्माण करण्यासाठी सिद्ध असलेली पुनवट, ता. वणी, जि. यवतमाळ येथील ही खारूताईरूपी २१ वर्षीय तरुणी प्रणाली बेबी विठ्ठल चिकटे होय. ४ ऑक्टोबरपासून पुनवट या आपल्या गावातूनच तिने आपल्या अभियानास प्रारंभ केला. विशेष म्हणजे निसर्गाशी कायम सख्य जपणाऱ्या तिच्या शेतकरी कुटुंबाने आपल्या लेकीला खंबीर असा पाठिंबा दिला आहे. पर्यावरणाच्या हानीला जबाबदार आपणच. मग, निसर्गाला हानीमुक्त करण्याची सुरुवातही स्वत:पासूनच व्हावी, या कर्तव्याची जाणीव ती आपल्या प्रवासात भेटणाऱ्या नागरिकांना करवून देत आहे. तिने पडोली, जि. चंद्रपूर येथील सुशीलाबाई रामचंद्र मामीडवार सोशल वर्क येथून बीएसडब्ल्यूचे शिक्षण पूर्ण केले आहे. या दोन महिन्याच्या प्रवासात तिने यवतमाळ, चंद्रपूर आणि वर्धा जिल्हा पालथा घातला असून, सध्या ती नागपुरातील गावांना भेटी देत आहे. ती आपल्या वाक्चातुर्याने आपली सोय संबंधित गावांत निवासाची व्यवस्था करवून घेत आहे आणि याच काळात

बायाबापड्यांना निसर्गाबाबत जाणीवही करवून देत आहे. इथून ती भंडारा आणि गोंदियाकडे रवाना होणार आहे आणि पुढचे तीन-चार महिने सबंध महाराष्ट्रातील गावांत पोहोचणार आहे.

कोरोनाने दिला इशारा

कोरोना ही महामारी असली तरी तो एक निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने मिळालेला एक इशाराच आहे, असे प्रणाली म्हणते. स्त्रिया या निसर्गाच्या सर्वात जवळच्या आहेत आणि एक स्त्री म्हणून मी घेतलेला पुढाकार इतर तरुणांना प्रोत्साहित करणारा आहे. एक स्त्री एकटीच काय करू शकते, याचे हे उदाहरण आहे. इतर महिलांनीही सामाजिक जबाबदारीत आपले योगदान द्यावे, असे आवाहन प्रणाली करत आहे.

Web Title: She set out on a journey alone, to awaken the environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.