रवींद्र चांदेकर, वर्धा : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसला महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारासाठी घाम गाळावा लागणार आहे. यावेळी प्रथमच काँग्रेसचा उमेदवार रिंगणात नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद उफाळून येत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीमध्येही उमेदवारीवरून धुसफूस सुरूच आहे.
वर्धा लोकसभा मतदार संघात दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. भाजपाने तिसऱ्यांदा रामदास तडस यांना उमेदवारी बहाल केली आहे. अद्याप अधिकृतपणे महाविकास आघाडीचा उमेदवार घाेषित झाला नाही. केवळ काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे मतदार संघात फिरून आपण राष्ट्रवादीच्या ‘तुतारी’ चिन्हावर लढणार असल्याचे सांगत सुटले आहे. त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधूनच अंतर्गत विरोध सुरू झाला आहे. इच्छूक उमेदवार शैलेश अग्रवाल, नितेश कराळे आदींनी काळे यांनी आधी पक्षाचा राजीनामा देण्याचा घोषा लावला आहे, तर राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी ऐनवेळी काळे यांनी आमची उमेदवारी पळविल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, अर्ज भरण्याचा दिवस तोंडावर आला असताना महाविकास आघाडीने उमेदवाराची घोषणा केली नाही. तथापि, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढविणार असल्याचे जवळपास निश्चत झाले आहे. परिणामी यावेळी प्रथमच काँग्रेसचा उमेदवार लोकसभेच्या रिंगणात नसणार आहे. काँग्रेससह उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना यावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी घाम गाळावा लागणार आहे. त्यातही प्रचाराला अवघे १५ ते १६ दिवसच मिळणार आहे. एवढ्या कमी दिवसांत मतदारांसमोर नवीन चिन्ह घेऊन जाताना आघाडीच्या उमेदवारालाही चांगलाच घाम फुटणार आहे.
भाजपचा प्रचार सुरू, आघाडीत लाथाळी-
भाजपने उमेदवार घोषित करून अनधिकृतपणे प्रचाराला सुरूवातही केली आहे. त्यांचे उमेदवार विधानसभानिहाय दौरे करीत आहे. मात्र, महाविकास आघाडीत अर्ज भरण्याचा दिवस आला तरी अंतर्गत लाथाळ्या सुरू असल्याचे चित्र आहे. विशेषत: काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी इच्छूक असलेले नेते संभाव्य उमेदवाराला विरोध करीत असल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीतील ही अंतर्गत धुसफूस शमविण्याचे आव्हान पक्षश्रेष्ठींपुढे उभे ठाकले आहे. हे आव्हान शमविल्यानंतरच उमेदवारीची घोषणा केली जाईल, असा कयास वर्तविला जात आहे.
आजपासून दाखल होणार अर्ज -
लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवार, २८ मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. ५ एप्रिलला प्राप्त अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर ८ एप्रिलपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. त्याच दिवशी दुपारनंतर रिंगणातील उमेदवारांना चिन्ह वाटप होणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ९ एप्रिलपासून प्रचाराला सुरूवात होईल. मतदानाच्या ४८ तासांआधी जाहीर प्रचार बंद करावा लागतो. त्यामुळे २४ मार्च रोजी सायंकाळी जाहीर प्रचार बंद होणार असल्याने उमेदवारांना केवळ १६ दिवस मिळणार आहे.