शिवसेना जिल्हा समन्वयक दिलीप माथनकर यांचा भाजपा प्रवेश
By योगेश पांडे | Published: March 30, 2023 06:50 PM2023-03-30T18:50:56+5:302023-03-30T18:51:35+5:30
Nagpur News शिवसेना ठाकरे गटाचे नागपूर जिल्हा समन्वयक माजी उपजिल्हाप्रमुख दिलीप माथनकर यांनी आज नागपूर येथील उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी देवगिरी येथे भाजपात प्रवेश केला.
नागपूर: शिवसेना ठाकरे गटाचे नागपूर जिल्हा समन्वयक माजी उपजिल्हाप्रमुख दिलीप माथनकर यांनी आज नागपूर येथील उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी देवगिरी येथे भाजपात प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी यांचे पक्षात स्वागत केले भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दिलीप माथनकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याने नाराजी व्यक्त केली होती. नागपूर शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार मागे घेतल्यानंतर काँग्रेससाठी ही जागा सोडल्याने त्यांनी उघड टीका करीत शिवसेना पक्षाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते. त्यांनतर त्यांना जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली होती. राज्यात शिवसेना व भाजपाची युती मागील अनेक वर्षापासून आहे. परंतु उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचे विचार सोडून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आघाडी करून सरकार स्थापन केले. शिवसेना हा भाजपाचा वैचारिक मित्र असताना शिवसैनिकांना विश्वासात न घेता उद्धव ठाकरे यांनी वैचारिक शत्रू असलेल्या पक्षांसोबत आघाडी केली, यामुळे शिवसैनिकांत अस्वस्थता असून त्यांनी काय करावे हेच सुचत नाही असे मत व्यक्त करतानाच भाजपामध्ये प्रवेश करून हिंदुत्वाच्या विचारांवर काम करता येईल असा निश्चय केल्याने प्रवेश घेतला असे यावेळी दिलीप माथनकर यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपात योग्य सन्मान दिला जाईल असा शब्द माथनकर यांना दिला. यावेळी आमदार मोहन मते माजी महापौर संदीप जोशी, धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष गजेंद्र आसोटकर, डॉ. अभय दातारकर, प्रफुल वाहादुडे, प्रशांत घोरमारे, सीए कैलास अडकिने, राजेंद्र नाकाडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.