नागपूर : बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरी पुनर्वसन परिसरात एका व्यावसायिक व्यक्तीने स्वतःला कारमध्येच जाळून घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्याने स्वत:च्या पत्नी व मुलालादेखील जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र ते त्यातून बचावले. परंतु त्यांच्या डोळ्यासमोरच व्यावसायिकाचा अक्षरश: कोळसा झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. रामराज गोपाळकृष्ण भट (६३, जयताळा) असे मृतक व्यक्तीचे नाव असून आर्थिक तंगीतून त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
रामराज पत्नी संगीता व मुलगा नंदनसोबत भट खापरी पुनर्वसन परिसरात गेले होते. पत्नी व मुलगा आगीत जखमी झाले असून त्यांच्यावर खापरी येथील स्वामी विवेकानंद इस्पितळात उपचार सुरू आहेत.
रामराज भट यांचे नट-बोल्ट उत्पादनाचे काम होते. विविध कंपन्यांना ते माल पुरवठा करायचे. कोरोनामुळे त्यांच्या व्यवसायाला प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे भट आर्थिक कोंडीला सामोरे जात होते. त्यांचा मुलगा नंदन इंजिनियर होता. रामराज नंदनला काम करण्याची विनंती करत होता, मात्र त्याने नकार दिला होता. त्यामुळे भट अधिकच चिंतेत होते. भट यांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
वर्धा मार्गावरील एका पॉश हॉटेलमध्ये जेवणाच्या बहाण्याने ते पत्नी व मुलाला घेऊन कारमधून निघाले. जवळपास एकच्या सुमारास खापरी पुनर्वसन केंद्राजवळ कार थांबवून भट यांनी पत्नी व मुलाला पिण्यासाठी विष दिले. दोघांनाही संशय आल्याने भट यांनी हे ॲसिडिटीचे औषध असल्याचे सांगण्यास सुरुवात केली. औषधाचा रंग काळा असल्याने मुलाने ते घेण्यास नकार दिला. यानंतर भट यांनी त्यांच्याजवळील बाटलीतील द्रवपदार्थ तिघांवरही फवारला आणि पत्नी व मुलाला काही समजण्यापूर्वीच त्यांनी कार पेटवून दिली. यात तिघेही भाजले, परंतु आई व मुलगा जखमी झाले. तर वडीलांचा मात्र मृत्यू झाला.
प्लास्टिकमध्ये गुंडाळून फेकली सुसाईड नोट
भट आत्महत्या करण्यासाठी पूर्ण तयारीनिशी आले होते. सुसाईड नोट त्याने पाकिटात ठेवली होती. पावसामुळे आत्महत्या करण्यापूर्वी पाकिट फॉइलमध्ये गुंडाळून कारपासून काही अंतरावर फेकून दिली होती. तेथे पोहोचल्यानंतर काही काळ पोलिसही आगीचे कारण काय आहे याबाबत संभ्रमात पडले होते. काही अंतरावर पाकिट सापडल्याने आत्महत्येचे कारण समोर आले. सुसाईड नोट कन्नड आणि इंग्रजीमध्ये लिहिली होती. प्रचंड आर्थिक विवंचनेमुळे हे पाऊल उचलत असून यासाठी कुणीही जबाबदार नसल्याचे त्यांनी त्यात लिहीले. भट यांनी बहिणींना संबोधित करताना बँकेत जमा केलेल्या रकमेची माहिती दिली.
आग लागल्यावर बऱ्याच वेळाने मदत
घटनास्थळ निर्जन असल्याने कोणाचेही लगेच लक्ष गेले नाही. कारने पेट घेतल्यावर बऱ्याच वेळाने लोक जवळ आले. त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. बेलतरोडी पोलीस तेथे पोहोचले. भट यांचा मृत्यू झाला होता. तर पत्नी आणि मुलाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविली.
नातेवाईकांना मोठा धक्का
पोलिसांनी भट यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. या घटनेने भट यांच्या नातेवाईकांनाही मोठा धक्का बसला आहे. त्यांनी भट हे संवेदनशील आणि जबाबदार व्यक्ती असल्याचे सांगितले. बेलतरोडी पोलीस रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाच्या तपासात गुंतले होते.