नागपुरात जीवनरक्षक औषधांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 10:46 PM2018-03-13T22:46:58+5:302018-03-13T22:47:20+5:30

Shortage of large number of life-saving medicine in Nagpur | नागपुरात जीवनरक्षक औषधांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा

नागपुरात जीवनरक्षक औषधांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा

googlenewsNext
ठळक मुद्देमेयोच्या वाढल्या अडचणी : रुग्णांना पदरमोड करून विकत घ्यावे लागत आहे औषध

लोकमत न्यूज नेटवर्क    
नागपूर : आशेचा किरण म्हणून ज्या मेयोकडे पाहिले जाते त्याच रुग्णालयामध्ये आता औषधांचा ठणठणाट असल्याने गरीब रुग्ण अडचणीत आला आहे. ग्लोव्हजपासून ते जीवनरक्षक औषधांच्या तुटवड्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांवर पदरमोड करून बाहेरून औषधे विकत घेण्याची वेळ आली आहे.
राज्यातील वेगवेगळ्या विभागांकडून वेगवेगळ्या दरांनी होणाऱ्या औषध खरेदीमुळे निर्माण होणारा गोंधळ व घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी ‘हाफकीन कॉर्पाेरेशन’च्या माध्यमातून सर्व औषधे व उपकरणांची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग व शासनाचे अन्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य संस्थांसाठी लागणारी औषधे, तद्नुषंगिक उपभोग्य वस्तू व वैद्यकीय उपकरणांची खरेदी आॅगस्ट २०१७ पासून हाफकीनकडून होणार होती. परंतु जानेवारी २०१८ पर्यंत खरेदी रखडली. फेब्रुवारी महिन्यापासून हाफकीनकडूनच औषधांची खरेदी होणार असल्याच्या सूचना करीत शासनाने औषधे खरेदी करण्यासाठी असलेले रुग्णालयीन स्तरावरील ‘रेट कॉन्ट्रॅक्ट’ (आरसी) संपुष्टात आणले. यामुळे कसेतरी पुरवठादाराकडून कमी जास्त प्रमाणात मिळणारी औषधेही बंद झाली. यातच आता मध्यवर्ती खरेदीची प्रक्रिया राबविली जाणार असल्याने मेयोला औषधे खरेदीसाठी लागणारा ९० टक्के निधी संबंधित हाफकीनकडे वळता करावा लागणार आहे तर १० टक्के निधी हा स्थानिक खरेदीसाठी वापरता येणार आहे. सध्या याच निधीवर मेयोच्या औषधांचा कार्यभाग साधला जात असल्याने मोजकाच औषधांचा साठा उपलब्ध आहे.
आधी ग्लोव्हज नंतरच शस्त्रक्रिया
मेयोमध्ये रोज किरकोळ व गंभीर स्वरुपातील अशा १५वर शस्त्रक्रिया होतात. परंतु ग्लोव्हजचा तुटवडा पडल्याने रुग्णाच्या नातेवाईकांना शस्त्रक्रियेआधी ग्लोव्हज आणायला सांगितले जात आहे. ग्लोव्हज आणल्यावरच शस्त्रक्रियांना हात लावला जात असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.
जीवनरक्षक औषधांसाठी धावाधाव
रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागापासून ते वॉर्डात अ‍ॅन्टीबायोटिकसह जीवनरक्षक औषधे फारच मोजक्या प्रमाणात उपलब्ध आहेत. यामुळे ऐनवेळी रुग्णांना या औषधांसाठी धावाधाव करावी लागत आहे. सध्या रुग्णालयात सिप्रोफ्लोक्सॅसिन, मेट्रोनिडॅझोल, अ‍ॅम्पिसीलीन, जेन्टामायसिन, पेरिनॉर्म डिक्लोफेनॅक, सिफोटॉक्सिम यासारखे अनेक महत्त्वाचे इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.
सलाईनही नाहीत
मेयोमध्ये दिवसभरात विविध प्रकारच्या सुमारे पाचशेवर सलाईन लागतात. गेल्या काही महिन्यापासून सामान्य प्रकारातील सलाईनचाही तुटवडा पडला आहे. सलाईनही बाहेरून विकत घ्यावी लागत असल्याने, अनेक रुग्ण पैशांची मदत होईपर्यंत ताटकळत राहत आहे. अतिगंभीर व अपघातग्रस्त रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोडियम क्लोराईड, डेक्सट्रोस, डेक्सट्रोस नॉर्मल सलाईन आणि रिंगर लॅक्टेक सलाईनचाही मोजकाच साठा असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.

Web Title: Shortage of large number of life-saving medicine in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.