विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आता अणेंचे पुस्तक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 10:48 PM2019-11-13T22:48:14+5:302019-11-13T22:48:22+5:30
विदर्भ राज्य निर्मितीच्या दस्तावेजांवर आधारित; विद्वत परिषदेने दिली मान्यता
नागपूर : ज्येष्ठ विदर्भवादी नेते व राज्याचे माजी महाधिवक्ता अॅड.श्रीहरी अणे यांनी विदर्भ राज्य निर्मिती आंदोलनाच्या दस्तावेजांवर संपादित केलेल्या पुस्तकातून विद्यार्थी आता धडे घेऊ शकणार आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने या पुस्तकाला ‘एम.ए.’ (राज्यशास्त्र) अभ्यासक्रमात लावण्यास मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे अगोदर याच पुस्तकाला त्याच्या नावामुळे अभ्यासक्रमात लावण्यास विद्यापीठाने नकार दिला होता. बुधवारी झालेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत राज्यशास्त्र अभ्यासमंडळाकडून यासंदर्भात प्रस्ताव मांडण्यात आला.
कुलगुरुंनी पुस्तकात दिलेल्या माहितीचे वाचन केले. तसेच यात कुठलीही आक्षेपार्ह बाब नसल्याची भूमिका मांडली. अगोदरदेखील या पुस्तकावर चर्चा झाली होती व त्यावेळी अभ्यासमंडळाकडून झालेल्या चुकीचा उल्लेखामुळेच हा गैरसमज झाला होता, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर सभागृहाने या प्रस्तावाला मान्यता दिली.