लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या श्रीसूर्या समूहाच्या १५ बिझनेस असोसिएटस्विरुद्ध एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. बिझनेस असोसिएटस्नी गुंतवणूकदारांना फसविण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.बिझनेस असोसिएटस्मध्ये कौस्तुभ सुधीर मुकटे (२९), भूषण प्रभाकर पाटील (४३), सुशील मुरलीधर आरासपुरे (३३), सुधीर गोविंद मुकटे (६५), वैभवी परेश टोकेकर, अमृता मंगेश पितळे (३९), विजय मधुकर दुबे (५१), मधुश्री राघवेंद्र बल्लाळ (४४), विनोद नारायण मायी (६२), नीलेश विजय पलिये (३७), विनय सुधाकर बुटोलिया (४५), चेतन मोहन मोहगावकर (३७), आशिषकुमार वासुदेव भट्टाचार्य (६०), गुलाब गोकुलदास महंत (७४) व प्रवीण दिवाकर राऊत (४०) यांचा समावेश आहे.श्रीसूर्या समूहाचा सर्वेसर्वा समीर जोशी हा या गुन्ह्याचा मास्टर मार्इंड आहे. जोशी व त्याची पत्नी पल्लवी यांच्यासह एकूण ११ जणांविरुद्ध भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, २०१, ३४, महाराष्ट्र गुंतवणूकदार हित संरक्षण कायदा (एमपीआयडी) यामधील कलम ३ व भारतीय रिझर्व्ह बँक कायद्यातील कलम ४५ (एस), ५८(ब) व ५ (ए) अंतर्गत दोषारोप निश्चित झाले आहेत. यापैकी भादंविच्या कलम ४०९ मध्ये जन्मठेपेची तरतूद आहे. या कलमावर जोशीने आक्षेप घेतला होता. न्यायालयाने त्याचे आक्षेप फेटाळून ही कलम कायम ठेवली आहे.