नागपूर : दिव्य दरबारवरून चर्चेत आलेले मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्या समर्थनार्थ विश्व हिंदू परिषदेने शुक्रवारी आंदोलन केले, तर दुसरीकडे भाजपचे आमदार मोहन मते यांनी जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव यांच्यावर टीकास्त्र सोडले. इतर धर्मांतदेखील मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा पसरविण्याचे काम सुरू आहे. त्याबाबत मानव कधीच शब्ददेखील उच्चारत नाहीत. त्यांनी इतर धर्मांतील बुवाबाजीचा भंडाफोड करावा, आम्ही त्यांना पुरावे देतो, असे आव्हानच त्यांनी दिले.
आम्ही दिलेल्या आव्हानामुळे महाराजांनी नागपुरातून गाशा गुंडाळला, असा दावा मानव यांनी केला होता. यावर मते यांनी त्यांच्याविरोधातच प्रश्न उपस्थित केले. मानव हे हिंदू विरोधी अजेंडा राबवत असून, हिंदू धर्माला बदनाम करण्याचे हे षड्यंत्र आहे. श्याम मानव यांच्यामुळे साधा कुत्राही पळत नाही. त्यांनी अशा वल्गना करणे बंद केले पाहिजे. श्याम मानव जिथे कुठे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करतात, तेथील लोकांना माहिती आहे की, त्यांची किती पात्रता आहे. केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी श्याम मानव यांनी हे प्रकरण उचलून उभे केले आहे, असा आरोप मते यांनी लावला.
हिंदुत्ववादी संघटनांकडून आंदोलन
बागेश्वर सरकार यांचे समर्थक, विहिंप, बजरंग दल आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांकडून नागपुरात आंदोलन करण्यात आले. संविधान चौक येथे शुक्रवारी दुपारी आंदोलनात श्याम मानव यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी हस्तक्षेप करत हा पुतळा ताब्यात घेतला. यामुळे काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. केवळ हिंदू धर्मीयांना बदनाम करण्याचे हे कटकारस्थान असून, हिंदू धर्मीय हे कदापि सहन करणार नाही, असा इशारा देण्यात आला.