सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिकलसेल रुग्णांना मोफत तपासणी, मोफत औषधोपचार, मोफत समुपदेशन व सर्व सुविधा पुरविण्याचा नियम आहे. परंतु इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) गर्भातील जीवाला सिकलसेल आहे की नाही, या ‘सीव्हीएस’ तपासणीसाठी आधी चार हजार शुल्क भरण्याचा नियम आहे. विशेष म्हणजे, डागा व मेडिकलमध्ये याचे नमुने घेण्याचीही सोय नाही. रुग्णाला मेयोची पायपीट करावी लागत असल्याने सिकलसेलवर कसे मिळणार नियंत्रण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.सिकलसेलवर अद्याप कोणतेही प्रभावी औषधोपचार उपलब्ध नाही. विवाहापूर्वी घेतलेल्या दक्षतेमुळेच हा आजार नियंत्रित केला जाऊ शकतो. मात्र, शासनाचा उदासीनपणा, शासकीय रुग्णालयांमध्ये अद्यावत तंत्रज्ञानाचा अभाव व डॉक्टरांच्या उदासीनतेमुळे विदर्भात हा आजार दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याचे चित्र आहे.सिकलसेल तपासणीसाठी सर्वप्रथम गर्भवतीची ‘सोल्युबिलिटी टेस्ट’ केली जाते. यातून केवळ सिकलसेल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असे निदान होते. यानंतर ‘कन्फर्मेशन टेस्ट’ (इलेक्ट्रोफोरेसिस) केली जाते. या चाचणीद्वारे ‘पॅटर्न कन्फर्म’ होते. यानंतर ‘एसएस पॅटर्न’ असलेल्या रुग्णांची ‘एचपीएलसी’ (हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमाटोग्राफी टेस्ट) केली जाते. गरोदर माता ‘एसएस पॅटर्न’ची असल्यास गर्भातील बाळाच्या नाळेतून छोटा टिश्यू काढून त्याची ‘कोरिओनिक विल्स सॅम्पलिंग’ (सीव्हीएस) चाचणी केली जाते. या चाचणीतून गर्भातला जीव सिकलसेलचा वाहक आहे, की ग्रस्त आहे, हे ठरते. गर्भातला जीव जर ‘एसएस पॅटर्न’मधला रुग्ण असेल तर गर्भपात करण्याचा सल्ला दिला जातो.ही चाचणी करण्यासाठी गरोदर मातेला आधी चार हजार रुपये शुल्क भरावे लागते. त्यानंतरच चाचणीसाठी नमुना मुंबईच्या ‘आयसीएमआर’ला पाठविला जातो. नमुन्याचा अहवाल आल्यावर हे पैसे परत केले जातात. परंतु ज्या समाजात हा आजार आढळतो त्यांच्यातील बहुतांश लोकांना हे शुल्क भरणेही कठीण जाते. यामुळे अनेक गरोदार माता या चाचणीपासून वंचित राहत असल्याचे वास्तव आहे.डागा, मेडिकलच्या रुग्णांची फरफट‘सीव्हीएस’ चाचणीचा नमुना घेण्यासाठी स्त्रीरोग तज्ज्ञाची गरज असते. डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) स्त्री रोगतज्ज्ञ असतानाही त्यांच्याकडील रुग्णांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) नमुने घेण्यासाठी पाठविले जाते. रुग्णांची ही फरफट कधी थांबणार, हाही प्रश्न आहे.
सिकलसेल जनजागृती आठवडा; तपासणी करायचीय, भरा चार हजार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 10:46 AM
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) गर्भातील जीवाला सिकलसेल आहे की नाही, या ‘सीव्हीएस’ तपासणीसाठी आधी चार हजार शुल्क भरण्याचा नियम आहे.
ठळक मुद्देमेयोतील वास्तव सिकलसेलवर कसे मिळणार नियंत्रण ?