लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रक्ताशी निगडित सिकलसेलग्रस्त रुग्णांवर योग्य उपचार व संशोधनासाठी नागपुरात सिकलसेल एक्सलन्स सेंटरची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. हे सेंटर उत्तर नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्र येथे होणार होते. परंतु येथे या सेंटरसाठी आवश्यक सोयी उपलब्ध नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेडिकलच्या परिसात हे सेंटर उभे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आता हे सेंटर मेडिकलमध्ये होणार असून अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी नर्सिंग कॉलेजच्या मागील अडीच एकरची जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.एकीकडे मृत्यूचे भय तर दुसरीकडे शासनाकडून अवहेलना या कात्रीत सिकलसेल रुग्ण जीवन जगत आहे. या आजाराच्या रुग्णांनी केलेल्या आंदोलनातून २०१५ मध्ये ‘सिकलसेल एक्सलन्स सेंटर’ची घोषणा हिवाळी अधिवेशनात करण्यात आली. परंतु हे सेंटर कागदावरच होते. सप्टेंबर २०१७ रोजी मेडिकलमध्ये ‘बोनमॅरो रजिस्ट्री’ प्रकल्पाचे उद्घाटनप्रसंगी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी या सेंटरची घोषणा केली. तेव्हापासून या प्रकल्पाला गती आली. उत्तर नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्राच्या जागेवर हे सेंटर उभारण्यात येणार होते. दोन टप्प्यात या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार होते. परंतु दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाला घेऊन बैठक घेतली. यात त्यांनी सेंटरसाठी व रुग्णाच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक सोई तिथे उपलब्ध नसल्याने मेडिकलमध्ये हे सेंटर सुरू करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीचे कार्यवृत्तात याचा समावेश असून मेडिकल ती प्राप्त झाली आहे. सुत्रानुसार, या सिकलसेल एक्सलन्स सेंटरबाबत प्रकल्प प्रमुख डॉ. दीप्ती जैन यांनी रविवारी वैद्यकीय शिक्षण सचिव संजय देशमुख यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीच्या कार्यवृत्ताचा हवाला देत जागा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी अडीच एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. जागा निवडताना मेयोच्या अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे व डॉ. दीप्ती जैन उपस्थित होत्या, अशीही माहिती आहे.नर्सिंग कॉलेजमागील जागासिकलसेल एक्सलन्स सेंटरसाठी मेडिकलमधील नर्सिंग कॉलेजच्या मागील परिसरातील अडीच एकरची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुग्णांच्या व संशोधनाच्या दृष्टीने या सेंटरचा मोठा फायदा होईल.-डॉ. अभिमन्यू निसवाडेअधिष्ठाता, मेडिकल