नागपूर : जमिनीची मोजणी करणे, त्यांचे अभिलेख तयार करणे ही महत्त्वाची तसेच तांत्रिक कामे करण्याचे काम भूमी अभिलेख विभाग करतो. परंतु या विभागातील कर्मचाऱ्यांना लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात येत होते. आता शासनाने जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालकांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती स्थापन केली असून समितीला तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतनश्रेणी मिळण्याची शक्यता बळावली आहे.
आधारे हद्दीच्या खुणा कायम करतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर हद्दीचे वादविवाद मिटविण्यास मदत होते. याशिवाय शासनाच्या सर्व प्रकल्पांसाठी भूसंपादनाचे काम याच विभागातर्फे करण्यात येते. विभागातील कर्मचारी पूर्वी प्लेन टेबलद्वारे मोजणीचे काम करीत होते. परंतु आता अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स टोटल स्टेशन मशीनद्वारे मोजणीचे काम होते. वन विभाग, एमआयडीसी व महानगरपालिकेतील भूकरमापकांना तांत्रिक वेतनश्रेणी मिळते. परंतु भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतनश्रेणीपासून वंचित रहावे लागत होते. याबाबत विभागातील कर्मचाऱ्यांनी वेतनश्रेणीसाठी अनेकदा शासनास निवेदने देऊन आंदोलने केली. तरीही काहीच कारवाई करण्यात न आल्यामुळे अमरावती व नागपूर विभागातील ९९ कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई नागपूर खंडपीठात शासनाविरोधात अर्ज केला होता. त्यानुसार न्यायालयाने महाराष्ट्र शासनास समिती गठित करुन अपिल केलेल्या कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी निश्चित करण्यासाठी १४ जानेवारी २०२० रोजी आदेश दिले. त्यानुसार महसूल विभागाने ९ जुलै २०२१ रोजी शासन निर्णय काढून जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती गठित केली. ही समिती तीन महिन्यात आपला अहवाल देणार असल्यामुळे कर्मचाऱ्यांना लवकरच तांत्रिक वेतनश्रेणी मिळण्याची अपेक्षा आहे. तांत्रिक वेतनश्रेणी मिळावी यासाठी अॅड. मुग्धा चांदूरकर, अॅड. रोहन चांदूरकर, पवन कुमार केवटे, अभय पाटील, शदाब शेख, मिथिल धात्रक, नवीन राऊत, हितेश भोगे, धीरज लोही, राजेंद्र कामडे, विकास गडरिये, गौरव निघोट आणि ९८ अपिल केलेल्या कर्मचाऱ्यांनी पाठपुरावा केला.
............
शैक्षणिक अर्हतेत केला होता बदल
जनतेची कामे जलदगतीने व गुणवत्तापूर्ण व्हावी या दृष्टिकोनातून शासनाने दिनांक १७ डिसेंबर २०२१ रोजी भूकरमापक या पदांसाठी सेवा प्रवेश नियम बदलले. हे कर्मचारी स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी किंवा आयटीआय सर्वेक्षण अशी शैक्षणिक अर्हता धारण केलेले असावेत, अशी शैक्षणिक अर्हता निश्चित केली. तरीसुद्धा आतापर्यंत भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतनश्रेणी देण्यात आली नाही.
.........
भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्यांची महत्त्वाची कामे
-जमिनीची मोजणी करणे
-जमिनीचे अभिलेख तयार करणे
-हद्दीचे वादविवाद मिटविणे
-शासनाच्या प्रकल्पासाठी भू संपादन करणे
.............