गायक हनीसिंगला विदेशात जाण्याची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 09:59 PM2018-10-02T21:59:18+5:302018-10-02T21:59:49+5:30
सत्र न्यायालयाने पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंग याला गाण्याचे कार्यक्रम करण्यासाठी विदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. यासंदर्भात हनीसिंगने दाखल केलेला अर्ज मंजूर करण्यात आला आहे. न्यायाधीश पी. एफ. सय्यद यांनी हनीसिंगला हा दिलासा दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सत्र न्यायालयाने पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंग याला गाण्याचे कार्यक्रम करण्यासाठी विदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. यासंदर्भात हनीसिंगने दाखल केलेला अर्ज मंजूर करण्यात आला आहे. न्यायाधीश पी. एफ. सय्यद यांनी हनीसिंगला हा दिलासा दिला.
व्यावसायिक आनंदपालसिंग जब्बल यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी २६ एप्रिल २०१४ रोजी रॅप गायक यो यो हनीसिंग व बादशाह यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. हे दोन्ही गायक अश्लील गाणी गातात असा जब्बल यांचा आरोप आहे. २७ आॅक्टोबर २०१५ रोजी सत्र न्यायालयाने या दोघांना सदर प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर करताना पूर्वपरवानगीशिवाय देशाबाहेर जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे हनीसिंगने गाण्याच्या कार्यक्रमांकरिता विदेशात जाण्याची परवानगी मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयात सादर माहितीनुसार येत्या ३० आॅक्टोबरपर्यंत हनीसिंगचे बँकॉक, दुबई, लंडन व हवाना येथे कार्यक्रम आहेत. विदेशात असताना अटींचे पालन करण्याची समज न्यायालयाने त्याला दिली आहे. हनीसिंगच्या वतीने अॅड. अतुल पांडे व अॅड. आशिष किलेदार यांनी कामकाज पाहिले.