नागपुरातील परिस्थिती हाताबाहेर, लॉकडाऊन लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 09:54 PM2020-09-14T21:54:38+5:302020-09-14T21:57:43+5:30
कोरोनामुळे वाढते मृत्यू आणि बाधितांची संख्या चिंता वाढविणारी आहे. त्यातच बाजारात दिवसेंदिवस वाढणारी गर्दी, फिजिकल डिस्टन्सचा उडालेला फज्जा, मास्कचा वापर न करता फिरणे, नियमांचे सर्रास उल्लंघन अशी परिस्थिती सर्वत्र आहे. याला आळा घालण्यासाठी संसर्गाची साखळी तोडणे गरजेचे आहे. याचा विचार करता काही दिवसांचा लॉकडाऊन लावला जावा, अशी भूमिका मनपातील पदाधिकाऱ्यानी मांडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे वाढते मृत्यू आणि बाधितांची संख्या चिंता वाढविणारी आहे. त्यातच बाजारात दिवसेंदिवस वाढणारी गर्दी, फिजिकल डिस्टन्सचा उडालेला फज्जा, मास्कचा वापर न करता फिरणे, नियमांचे सर्रास उल्लंघन अशी परिस्थिती सर्वत्र आहे. याला आळा घालण्यासाठी संसर्गाची साखळी तोडणे गरजेचे आहे. याचा विचार करता काही दिवसांचा लॉकडाऊन लावला जावा, अशी भूमिका मनपातील पदाधिकाऱ्यानी मांडली आहे.
कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात यावा, अशी मागणी मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी सोमवारी पालकमंत्री नितीन राऊत यांना दिलेल्या पत्रातून केली आहे.
दरम्यान, लॉकडाऊन झालेच तर ते किमान एक आठवड्यांचे असावे, अशी मागणी पुढे येत आहे. सम-विषमचा नियम रद्द करण्याच्या मागणीसह चाचणीलाही विरोध करणारे अनेक व्यापारी आता लॉकडाऊनचे समर्थन करत आहेत. त्यांच्याकडील कर्मचारीच आता करोनाबाधित होऊ लागले आहेत. त्यामुळे लॉकडाऊनची मागणी पुढे येत आहे.
लॉकडाऊन आवश्यकच
शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग व उपचारासाठी होत असलेल्या रुग्णांची भटकंती विचारात घेता परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी संसर्गाची साखळी खंडित करणे गरजेचे आहे. याचा विचार करता लॉकडाऊन लावला जावा, असे माझे वैयक्तिक मत आहे.
पिंटू झलके, अध्यक्ष स्थायी समिती
चेन ब्रेक करण्याची गरज
शहरात कोरोनाबाधित व मृतकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी चेन ब्रेक करण्याची गरज आहे. यासाठी किमान एक आठवड्याचा लॉकडाऊन लावला जावा. आज रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. परिस्थिती हाताबाहेर जात आहे. याला आळा घालण्याची गरज आहे.
- दुनेश्वर पेठे, गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस मनपा
असे आहेत पत्रातील मुद्दे
- शहरात सात दिवसांचा लॉकडाऊन लावावा.
- दर शनिवार-रविवार जनता कर्फ्यू पाळण्यात यावा.
- कोरोना रुग्णांसाठी हास्पिटलमध्ये बेडची संख्या वाढविण्यात यावी.
- रुग्णवाहिका अधिक संख्येने उपलब्ध कराव्यात.
- ऑक्सिजन सिलिंडर मागणीनुसार उपलब्ध व्हावे.