कुख्यात आंबेकरसह दोघांना सहा दिवसांची पोलीस कोठडी
By admin | Published: March 4, 2016 02:48 AM2016-03-04T02:48:40+5:302016-03-04T02:48:40+5:30
सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खामला सहकारनगर गजाननधाम येथील अभियंते स्वप्नील बिडवई यांच्या घरावर फसवेगिरीतून ...
सहकारनगरातील अभियंत्याच्या घरावरील अवैध कब्जा प्रकरण
नागपूर : सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खामला सहकारनगर गजाननधाम येथील अभियंते स्वप्नील बिडवई यांच्या घरावर फसवेगिरीतून अवैध कब्जा केल्याप्रकरणी मोक्का विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाने कुख्यात गुन्हेगार संतोष आंबेकर याच्यासह दोन जणांना ९ मार्चपर्यंत (सहा दिवस) पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
संतोष शशीकांत आंबेकर (४०) रा. संती रोड इतवारी आणि प्रकाश चिंतामण मानकर (३०) रा. नवी वस्ती फुटाळा, असे हे आरोपी आहेत. त्यापैकी आंबेकर हा टोळीचा म्होरक्या आहे. यापूर्वी याच प्रकरणात डेव्हलपर्स सचिन जयंत आढूळकर (३७) रा. महाल, विजय मारोतराव बोरकर (५२) रा. टेलिफोननगर दिघोरी, लोकेश दिलीप कुभीटकर (२८) रा. विद्यानगर कोराडी, युवराज ठुनिया माथनकर (३३) रा. बेलतरोडी शिव हाईटस्, आकाश किशोर बोरकर (३१) रा. कामगार कॉलनी सुभाषनगर, शक्ती राजू ऊर्फ संजू मनपिया (३०) रा. बारासिग्नल, विनोद भीमा मसराम (३५) रा. सीताबर्डी आणि संजय ऊर्फ संजू रामोजी फातोडे (४२) रा. पांढराबोडी, अशा आठ जणांना मोक्काअंतर्गत अटक करण्यात आलेली होती. ते न्यायालयीन कोठडी रिमांडमध्ये असून कारागृहात आहेत.
या सर्व आरोपींविरुद्ध २३ जानेवारी रोजी सोनेगाव पोलीस ठाण्यात भादंविच्या ४४८, ४५२, १४१, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ -ब आणि महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायद्याच्या कलम ३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
असे होते प्रकरण
सहकारनगर गजाननधाम येथे स्वप्नील बिडवई यांचे १७५३ चौरस फुटाच्या भूखंडावर दोन मजली घर आहे. ही मालमत्ता त्यांच्या आईच्या नावे आहे. हे घर पाडून त्यावर चार मजली इमारत बांधून देण्याचा डेव्हलपर्स सचिन आढूळकर आणि विजय बोरकर यांचा प्रस्ताव होता. १२०० चौरस फुटाचे क्षेत्र असलेला पहिला मजला बिडवई यांच्या मालकीचा राहील.
याशिवाय १८ लाख ७५ हजार रुपये मोबदला म्हणून दिला जाईल, इमारतीच्या टेरेसची मालकी कायमस्वरूपी बिडवई यांचीच राहील, असाही प्रस्ताव होता. ३० डिसेंबर २०१५ रोजी महालच्या दुय्यम निबंधक कार्यालयात करार करून तो नोंदणीकृत करण्यात आला होता. (प्रतिनिधी)