नागपूर-बुटीबोरी मार्गावर सहा पदरी उड्डाणपूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2022 09:54 PM2022-06-27T21:54:19+5:302022-06-27T21:59:16+5:30
Nagpur News नागपूर ते बुटीबोरी हा मार्ग सहा पदरी करण्याऐवजी आता तेथे सहा पदरी उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गाची क्षमता तिपटीने वाढणार आहे. या कामामुळे हा शहरातील सर्वात लांब उड्डाणपूल ठरणार आहे.
नागपूर : नागपूर ते बुटीबोरी हा मार्ग सहा पदरी करण्याऐवजी आता तेथे सहा पदरी उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गाची क्षमता तिपटीने वाढणार आहे. या कामामुळे हा शहरातील सर्वात लांब उड्डाणपूल ठरणार आहे. त्याची एकूण लांबी १९.६८३ किमी असेल. हा पूल बांधल्यानंतर चिंचभुवन ते बुटीबोरी हे अंतर १५ मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. हा पूल बांधल्यानंतर चिंचभुवन, खापरी, जामठा आदी भागातील ब्लॅक स्पॉट्स देखील दूर होतील.
नवीन उड्डाणपुलाजवळील चिंचभुवन ते बुटीबोरी या १९.६८३ किमी लांबीच्या या प्रस्तावित पुलाची किंमत १६३२ कोटी रुपये आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे भूसंपादनाची गरज राहणार नाही. प्रस्तावित सहा पदरी रस्त्याच्या कामाला होत असलेल्या दिरंगाईमुळे आता या कामाला प्राधान्य देण्यात आले आहे. लवकरच मेट्रो आणि एनएचएआयच्या सल्लागारांची बैठक होऊन पुलाच्या आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे.
मिहानजवळ ‘एलिव्हेशन’
या पुलाला मिहानशी जोडला जाणार आहे. त्यानंतर पुलावरून जामठा स्टेडीयमसाठीही लँडिंग देण्यात येणार आहे. या पुलाला नऊ ठिकाणी आकर्षक स्वरूप येणार आहे. वर्धा मार्गावरील हा प्रस्तावित सहा पदरी पूल जामठा ते बुटीबोरी यादरम्यान डबलडेकर स्वरूपाचा असेल. हे अंतर १२ किलोमीटरचे आहे. त्यावरून मेट्रो धावेल. या कामामुळे मिहानपर्यंत धावणाऱ्या मेट्रोचा फेज-२ मध्ये बुटीबोरीपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूर ते बुटीबोरी औद्योगिक क्षेत्राच्या वाटचालीला मोठा दिलासा आणि गती मिळेल.
गडकरींनी घेतला आढावा
खापरी ते बुटीबोरी हा महामार्ग सहा पदरी करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी यापूर्वीच केली होती. त्यांनी या मार्गाचा आढावा घेतला व त्यात त्यांनी प्रस्तावित चिंचभुवन ते खापरी उड्डाणपूल बुटीबोरीपर्यंत वाढविण्यात यावा. ५० वर्षांनंतर स्थिती काय राहील हे अपेक्षित धरून या महामार्गाचे नियोजन करावे. महामार्गा शेजारचे सर्व्हिस रोडदेखील रुंद करत रिकाम्या जागेमध्ये फळांची झाडे लावण्याची त्यांनी सूचना केली. या बैठकीला नवी दिल्लीचे मुख्य महाप्रबंधक असाटी, प्रादेशिक अधिकारी नागपूर राजीव अग्रवाल, अधीक्षक अभियंता वडेटवार, नीलेश यावतकर, प्रामुख्याने उपस्थित होते.
अतिक्रमण हटवा, मोकळ्या जागांचा व्यावसायिक विकास करावा
शहरालगत महामार्गाशेजारी अनेक मोकळ्या जागा आहेत. या जागांची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. या जागा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यात आहेत. या जागांचा व्यावसायिक दृष्टीने विकास करावा. या जागांवर शौचालय, लहान बाळांना दुग्धपान करण्यासाठी कक्ष, पेट्रोल पंप, चार्जिंग स्टेशन निर्माण करा. यामुळे एनएचएआयला उत्पन्नही प्राप्त होईल. तसेच एनएचएआयच्या ज्या जागांवर अतिक्रमण करण्यात आले आहे, ते त्वरित हटविण्याचे निर्देशही गडकरींनी दिले.
पाचपावलीजवळ दोन रेल्वे अंडरपास
इंदोरा ते दिघोरी चौक-कमाल चौकापर्यंत नव्याने तयार होणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा गडकरी यांनी घेतला. यावेळी एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकल्पाचे व्हिडिओ मार्फत सादरीकरण केले. सध्या असलेला उड्डाणपूल तोडून नव्याने उड्डाणपूल करण्यात येत आहे. याच रस्त्यावर पाचपावली जवळ दोन रेल्वे अंडर पासही करण्यात येणार आहेत. कुठेही वाहतुकीची कोंडी होऊ नये. वाहतूक खोळंबण्याच्या दृष्टीने सर्व्हिस रोडवर असलेले अतिक्रमण हटवावे. दिघोरी चौकाच्या आधी चार पदरी अंडरपास करावा, अशी सूचना त्यांनी केली.