नरखेड स्थानकावर आणखी सहा रेल्वेगाड्या थांबणार; मध्य रेल्वेचा निर्णय
By नरेश डोंगरे | Published: August 19, 2023 01:56 PM2023-08-19T13:56:19+5:302023-08-19T13:59:26+5:30
२० ऑगस्टपासून अंमलबजावणी
नागपूर : प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत मध्य रेल्वेने नरखेड स्थानकावर आणखी सहा लांब अंतराच्या रेल्वे गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २० ऑगस्टपासून डॉ. आंबेडकर नगर - यशवंतपूर एक्सप्रेस या गाडीच्या रुपात होणार आहे.
अमृत भारत योजनेत समावेश झाल्यामुळे लवकरच नवे रंग रुप आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण होण्याच्या तयारीत असलेल्या नरखेड रेल्वे स्थानकाचे महत्व दिवसांगणिक वाढत आहे. येथून बसणाऱ्या - उतरणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेत आता मध्य रेल्वेने नरखेड स्थानकावर आणखी सहा लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर जिल्ह्यातील एक महत्वाचे रेल्वे स्थानक म्हणून नरखेडची ओळख आहे.
गेल्या काही वर्षांत या स्थानकावर प्रवाशांची गर्दी चांगलीच वाढली आहे. ते लक्षात घेऊन मध्य रेल्वेने नरखेड स्थानकावरून धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांना येथे यापूर्वी थांबे दिलेले आहेत. आता आणखी दूर अंतराच्या सहा नवीन रेल्वे गाड्यांना थांबे दिले आहेत. मध्य रेल्वेच्या या निर्णयाचे नागपूर जिल्ह्यातील आणि विशेषत: नरखेड परिसरातील नागरिकांकडून स्वागत होत आहे.
या आहेत त्या सहा रेल्वे गाड्या
१९३०१ डॉ. आंबेडकर नगर - यशवंतपूर एक्सप्रेस २० ऑगस्टपासून
१९३०२ यशवंतपूर - डॉ. आंबेडकर नगर एक्सप्रेस २२ ऑगस्टपासून
गाडी नंबर ११०४६ धनबाद - कोल्हापूर एक्सप्रेस : २१ ऑगस्टपासून
कोल्हापूर - धनबाद एक्सप्रेस : २५ ऑगस्टपासून
१९७१४ काचीगुडा - जयपूर एक्सप्रेस - २१ ऑगस्ट पासून
१९७१३ जयपूर - काचीगुडा एक्सप्रेस २६ ऑगस्ट पासून