योगेश पांडे
नागपूर : कुटुंबाच्या वंशाचा दिवा अन् सर्वांचा लाडका असलेल्या नातवांना घरचे लोक भेटतील म्हणून शनिवारपासून घरात उत्साहाचे वातावरण होते. नातवाला भेटण्याची इच्छा असतानादेखील गाडी लहान असल्याने ते घरीच थांबले अन् आपले आशीर्वाद कुटुंबीयांच्या माध्यमातून पाठविले. मात्र, नियतीच्या मनात वेगळेच काही तरी होते अन् काही तासांतच क्रूर आघात झाला. आजोबांनी दिलेला आशीर्वाद तर नातवापर्यंत पोहोचलाच नाही. मात्र, प्रत्येक संकटात खंबीरपणे उभी राहिलेली पत्नी, दोन्ही मुले, सख्खी बहीण आणि नेहमी संकटकाळी धावून येणारी साळी यांच्या मृत्यूचीच वार्ता आली. अक्षरश: कानात शिसे ओतल्यासारखा अनुभव आला अन् काळ तेथेच स्तब्ध व्हावा हाच विचार डोक्यात आला. आता त्यांच्या मनात एकच विचार, मला अन् माझ्या वृद्ध आईला आता आधार कुणाचा राहणार? एका क्षणात संपूर्ण कुटुंब गमावल्याने भानावर आल्यापासून चंदननगर निवासी विजय राऊत यांच्या डोळ्यातील अश्रू आटले होते अन् माझ्या वृद्ध आईला एकटा आधार कसा देऊ, ही एकच चिंता त्यांच्या काळजाला पोखरत होती.
चंदननगरातील शिवगौरी मंदिराजवळ राहणाऱ्या राऊत कुटुंबातील मुलगा रोहन (३०), ऋषिकेश (२८), त्यांची आई गीता (५२), आत्या सुनीता रूपेश फेंडर (४०), तिची मुलगी यामिनी (९), मावशी प्रभा शेखर सोनवाने (३५) यांचा ब्रह्मपुरी तालुक्यातील किन्ही येथे अपघातातमृत्यू झाला. त्यांच्या कारला ट्रॅव्हल्सची जोरदार धडक बसली. यात कारमधील पाच जण जागीच ठार झाले, तर यामिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता कुटुंबात केवळ विजय आणि त्यांची आई लक्ष्मीबाई हेच उरले आहेत. आमच्या तरुण मुलांना नेण्याऐवजी आम्हाला का नेले नाही, हाच दोघांचा नियतीला सवाल होता. विजय यांना दोनदा अर्धांगवायूचा झटका आला होता. अनेक संकटांतून बाहेर निघाल्यावरदेखील ते नातू परत सोबत राहायला येईल या आशेने मुख्य प्रवाहात परतले होते.
कुटुंब जोडायला गेले अन् कायमचेच ‘गेले’
रोहन व ऋषिकेश हे खासगी काम करायचे. मागील अडीच वर्षांपासून रोहन व त्याच्या पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वाद सुरू होता व ती वर्षभरापासून ब्रह्मपुरी तालुक्यातील किन्ही येथे माहेरी राहत होती. विजय हे दर महिन्यात नातवाला भेटायला जात होते आणि सुनेला घरी येण्याची विनंती करायचे. मुलाची खूप आठवण येत असल्याने रोहनने शनिवारी परिचिताची कार आणली. पुतण्याला भेटायचे म्हणून ऋषिकेशनेदेखील जाण्याचा आग्रह केला. तर, सुनेला समजविण्यासाठी विजय यांच्या पत्नी गीता, बहीण सुनीता व साळी प्रभा हेदेखील निघाले. कुटुंब जोडण्यासाठी सर्व जण गेले. मात्र, त्यांचा हा प्रवास अखेरचाच ठरला.
सौख्य काही काळाचेच
सुनीता फेंडर यांनी काही काळाअगोदरच इंदिरानगर भागात मोठ्या कष्टाने घर बांधले होते. पतीजवळ एका मुलीला ठेवून त्या दुसऱ्या मुलीसह गेल्या आणि त्यांच्यावर काळाने घाला घातला. नवीन घराचे त्यांचे सौख्य काही काळाचेच ठरले.
ट्रॅव्हल्सने कारला उडवले; नागपूरचे सहाजण ठार, एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश
चंदननगरात शोककळा
राऊत कुटुंबीयांची आर्थिक स्थिती बेताचीच असली तरी परिसरातील नागरिकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या घरीच एक दर्गा होता व तेथील सर्व कामे ऋषिकेश व त्याचे वडीलच करायचे. या अपघातामुळे परिसरातील नागरिकांनादेखील मोठा धक्का बसला आहे. काही तासांअगोदर निरोप घेऊन गेलेले हसतेखेळते कुटुंब अशा पद्धतीने विखुरल्यामुळे परिसरात शोककळा पसरली होती.