यात्रा ऑनलाईन कंपनीला ग्राहक मंचची चपराक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 08:45 PM2019-02-11T20:45:25+5:302019-02-11T20:47:57+5:30
शारीरिक-मानसिक त्रास व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागलेल्या तक्रारकर्त्या ग्राहकाला ६० हजार रुपये भरपाई देण्यात यावी असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने यात्रा ऑनलाईन कंपनीला दिला. या आदेशामुळे कंपनीला जोरदार चपराक बसली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शारीरिक-मानसिक त्रास व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागलेल्या तक्रारकर्त्या ग्राहकाला ६० हजार रुपये भरपाई देण्यात यावी असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने यात्रा ऑनलाईन कंपनीला दिला. या आदेशामुळे कंपनीला जोरदार चपराक बसली.
मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य नितीन घरडे व चंद्रिका बैस यांनी हा आदेश दिला. डॉ. तुषार पांडे असे तक्रारकर्त्यांचे नाव असून ते सोमलवाडा येथील रहिवासी आहेत. त्यांना शारीरिक-मानसिक त्रासापोटी ५० हजार व तक्रारीचा खर्च म्हणून १० हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी कंपनीला एक महिन्याची मुदत देण्यात आली.
तक्रारीतील माहितीनुसार, पांडे यांनी २६ ते ३० डिसेंबर २०१६ या कालावधीत कुटुंबासह अदमान व निकोबार येथे जाण्याकरिता यात्रा कंपनीकडून सेवा घेतली. ते २६ डिसेंबर रोजी अंदमान येथे पोहचले असता तेथील हॉटेलमध्ये निकृष्ट दर्जाची व्यवस्था होती. तसेच, त्यांचे फेरी ते पोर्टब्लेअर व पोर्ट ब्लेअर ते हवेलॉक प्रवासाचे तिकीट पक्के करण्यात आले नाही. त्यामुळे ते पुढचा प्रवास करू शकले नाही. यासंदर्भात तक्रार केली असता कंपनीने समाधानकारक दाद दिली नाही. कंपनीच्या त्रुटीपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्याला प्रेक्षणीय स्थळे पाहता आली नाहीत. तसेच, पोर्ट ब्लेअर व हवेलॉक येथेही आश्वासनाप्रमाणे सुविधा देण्यात आल्या नाहीत. परिणामी, ५ जानेवारी २०१७ रोजी पांडे यांनी कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवून पाच लाख रुपयाची भरपाई मागितली. त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी मंचमध्ये तक्रार दाखल केली होती. मंचने नोटीस बजावल्यानंतर यात्रा कंपनीने स्पष्टीकरण सादर करून ही तक्रार खारीज करण्याची विनंती केली होती. मंचने विविध बाबी लक्षात घेता तक्रार अंशत: मंजूर करून वरील आदेश दिला. पांडे यांच्यातर्फे अॅड. श्रद्धानंद भुतडा यांनी कामकाज पाहिले.
आनंदावर विरजण पडले
कंपनीच्या दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्ते व त्यांच्या कुटुंबीयांच्या आनंदावर विरजण पडले. मोठी रक्कम खर्च करूनही त्यांना मनाप्रमाणे पर्यटनाची मजा लुटता आली नाही. उलट त्यांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. हे सर्व कंपनीने अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केल्यामुळे घडले असे निरीक्षण मंचच्या निर्णयात नोंदविण्यात आले आहे.