संथ संकेतस्थळामुळे ‘नीट’ निकाल पाहण्यात अडथळे; कही खुशी, कही गम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2021 10:57 PM2021-11-01T22:57:36+5:302021-11-01T22:58:13+5:30
Nagpur News वैद्यकीय अभ्यासक्रमांतील प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या ‘नीट’चा निकाल सोमवारी सायंकाळनंतर जाहीर झाला. संकेतस्थळ संथ असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना रात्री उशिरापर्यंत निकाल पाहण्यात अडथळे येत होते.
नागपूर : वैद्यकीय अभ्यासक्रमांतील प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या ‘नीट’चा निकाल सोमवारी सायंकाळनंतर जाहीर झाला. संकेतस्थळ संथ असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना रात्री उशिरापर्यंत निकाल पाहण्यात अडथळे येत होते. महाविद्यालयांतून रात्री उशिरा प्राप्त झालेल्या माहितीनुसार या निकालांमध्ये नागपुरातील सेंट पॉल ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी आर्यन मिलिंद व्यवहारे या विद्यार्थ्याने ६९६ गुण मिळविले असून, सद्यस्थितीत तरी तोच शहरात प्रथम क्रमांकावर असल्याचे चित्र आहे. अखिल भारतीय पातळीवर त्याचा २४३ वा क्रमांक आहे. दरम्यान, नागपुरातील विद्यार्थ्यांचा निकाल अपेक्षेनुरुप राहिला नसल्याचे चित्र दिसून आले.
१२ सप्टेंबर रोजी शहरातील परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. विशेष म्हणजे ‘कोरोना’च्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते. कोरोनाचा प्रकोप कायम असल्याने विद्यार्थी व पालकांवर दुहेरी ताण होता. विद्यार्थी अनेक दिवसांपासून निकालाची प्रतीक्षा करीत होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एनटीए’तर्फे विद्यार्थ्यांच्या ई-मेलवर निकाल पाठविण्यात आले. शिवाय ‘लिंक’वरदेखील निकाल उपलब्ध करून देण्यात आले; मात्र अनेकांना वेळेत मेल मिळालेच नाही. दुसरीकडे संकेतस्थळावर निकालाची ‘लिंक’ उघडण्यात अडचण येत होती. ‘सर्व्हर’वर जास्त भार आल्यामुळे विद्यार्थ्यांना निकालासाठी प्रतीक्षा करावी लागली. दुसरीकडे महाविद्यालयांनादेखील निकालाचे विश्लेषण करता आले नाही. त्यामुळे नाइलाजाने धनत्रयोदशीच्या दिवशी काही शिक्षकांना महाविद्यालयांत यावे लागणार आहे. मंगळवारी निकालांचे नेमके चित्र स्पष्ट होऊ शकेल, अशी माहिती महाविद्यालयांतर्फे देण्यात आली.