... हे आहे नागपूर जिल्ह्यातील लघु पशु चिकित्सालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 10:57 AM2018-10-27T10:57:38+5:302018-10-27T10:58:06+5:30

शासनाच्या विविध विभागांच्या टोलेजंग इमारती एकीकडे बघावयास मिळतात, तर दुसरीकडे लघु पशु चिकित्सालयांच्या पडक्या इमारती अखेरच्या घटका मोजत आहे.

This is the small animal hospital in Nagpur district | ... हे आहे नागपूर जिल्ह्यातील लघु पशु चिकित्सालय

... हे आहे नागपूर जिल्ह्यातील लघु पशु चिकित्सालय

googlenewsNext
ठळक मुद्देमनुष्यबळासह जनावरांची आबाळ

विजय नागपुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासनाच्या विविध विभागांच्या टोलेजंग इमारती एकीकडे बघावयास मिळतात, तर दुसरीकडे लघु पशु चिकित्सालयांच्या पडक्या इमारती अखेरच्या घटका मोजत आहे. त्यामुळे गोवंश वाचविण्याची भाषा करीत असलेल्या शासनाच्या काळात गुरांच्या उपचाराची आबाळ होत आहे. याचे वैषम्य कुणालाही वाटत नाही. या दवाखान्याची एखादी इमारत कोसळून कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला या इमारतींच्या जीर्णोद्धारासाठी जाग येईल काय, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
कळमेश्वर तालुक्यातील बहुतांश शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करतात. त्यामुळे तालुक्यात आजमितीस ५,५९७ संकरित गाई, १,७९१ संकरित बैल व गोºहे, १३,४९१ देशीगाई, १४,७९९ देशीबैल, ५,८७८ म्हशी, २५,९७४ शेळ्या व १,४६३ मेंढ्या आहेत. शिवाय, कोंबड्या व पाळीव कुत्र्यांची संख्याही बरीच मोठी आहे. या प्राण्यांना योग्य उपचार मिळण्यासाठी कळमेश्वर येथे तालुका लघु पशु चिकित्सालय व ग्रामीण भागात नऊ दवाखान्यांची निर्मिती करण्यात आली.
या सर्व दवाखान्यांचा प्रशासकीय कारभार व पशुच्या वैद्यकीय सेवेची जबाबदारी तालुकास्तरावरील पशु चिकित्सालयाकडे सोपविण्यात आली. या दवाखान्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना राहण्यासाठी निवासस्थाने बांधण्यात आली.
दवाखान्याची इमारत सिमेंट काँक्रिटची असली तरी छताचे पापुद्रे पडायला सुरुवात झाली. कर्मचाऱ्यांची निवासस्थाने कौलारू असून, त्यांचीही दुरवस्था झाली आहे. वास्तवात या इमारतींचे नव्याने बांधकाम करण्याची नितांत गरज आहे. इमारत बांधकामाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास इमारत कोसळून जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्वच्छतागृहांची अवस्थाही दिव्य
अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दवाखान्याच्या परिसरात स्वच्छतागृहांची निर्मिती करण्यात आली. मात्र, ते वापरण्यायोग्य नसल्याने अधिकारी व कर्मचारी रोज पंचायत समिती कार्यालयातील स्वच्छतागृहाचा वापर करतात. पाण्याचा निचरा होण्याची सोय नसल्याने पावसाळ्यात चिकित्सालयाच्या आवाराला तलावाचे स्वरूप प्राप्त होते. एकीकडे, डासांना पोषक वातावरण मिळत असून, दुसरीकडे परिसरात दुर्गंधी पसरते. अनुकूल वातावरणामुळे या परिसरात डुकरांचा वावर वाढला आहे. सध्या या पशु चिकित्सालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणा गवत व झुडपे वाढलेली आहेत.

Web Title: This is the small animal hospital in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार